इसार घेऊन पसार होणाऱ्यांची संख्या वाढली

पुणे – शहरालगतच्या अनेक गावांचा समावेश हवेली तालुक्‍यात होत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. लोकसंख्येचा विचार करून लोकांचे राहणीमान व गरजा दिवसेंदिवस बदलत आहेत. पुणे शहरात कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदनिकांमध्ये गुंतवणूक केली आहे. काही नागरिकांनी जागा खरेदी करून घर बांधून स्वप्न पूर्ण केले आहे. मात्र वाड्या-वस्त्यांवर बांधकाम होणाऱ्या घरांबाबतीत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

बांधकामांचे ठेके घेणारे आणि ठेकेदार हे मान्यताप्राप्त असून देखील काम करण्याचा अनुभव असणारे कामांचे ठेके घेत आहेत. यात आगाऊ रक्‍कम स्वीकारून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करत आहेत. मात्र, बांधकामाचा ठेका घेण्यावेळी नियोजनानुसार खर्च जादा झाला तर ठेके सोडून ठेकेदार पळून जात आहेत. काही ठेकेदारांकडून हा प्रकार घडत आहे. त्यामुळे बांधकामांचे इसार घेऊन पसार होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही गृहप्रकल्पांमध्ये नियमानुसार बांधकामांचे ठेके देऊन सब ठेकेदार नेमण्याची संख्या वाढली आहे. काम सोडून देऊन मूळ मालकाचे नुकसान करण्याच्या हेतूने काही ठेकेदार पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे पसार होणाऱ्या ठेकेदारांवर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

साधारण एक वर्षापूर्वी बांधकामांच्या ठेक्‍यावरून वाघोलीमध्ये गोळीबार झाला होता. आता बांधकामांचे ठेके घेऊन ते काम अर्धवट टाकून फसवणूक करण्याच्या हेतूने काही व्यक्‍ती पुढे येत आहेत. त्यामुळे सदनिकाधारक, गृहप्रकल्पधारक तथा घरांचे बांधकाम करून घेणाऱ्या मालकांचे नुकसान होत आहे. पूर्ण घराचे बांधकाम एवढ्या रकमेत करून देतो. एकही रुपया जास्त देऊ नका, त्यासाठी आगाऊ रक्‍कम म्हणून एवढी रक्‍कम द्या, असे म्हणणारे कामाला सुरुवात करून नंतर फरार होत आहे. त्यांचा ठावठिकाणा सापडत नसल्याने नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. बांधकामांचे ठेके मिळवताना अधिकृत करार पद्धतीने काम करणारे फसवू लागले आहेत तर केवळ शब्द देऊन कामांचे ठेके मिळवणारे ठेके मिळवून देताना मध्यस्थी करणाऱ्यांना अडचणीत आणत असल्याचे चित्र अनेक गावांत दिसत आहे. यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेची आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.