इराणच्या सुवर्णयशावर भारतीय मोहोर 

मुंबई: आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणने महिला आणि पुरूष कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. इराणच्या खेळाडूंनी चांगला खेळ केलाच, पण या विजयाच्या शिल्पकार ठरले आहेत ते त्यांचे प्रशिक्षिक. इराणच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांना आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळालेल्या सुवर्णयशात भारताचाही मोठा हात आहे. महाराष्ट्रात बऱ्याच कबड्डीपटूंना घडवणाऱ्या शैलजा जैन या इराणच्या सुवर्णपदक विजेत्या संघाच्या प्रशिक्षिका आहेत. तर पुरुष संघाला गुजरातच्या केवलचंद सुतार यांचे मार्गदर्शन लाभले आहे त्यामुळे सुवर्ण जरी इराणला मिळाले असले तरी त्यावर भारतीय मोहोर लागलेली आहे.
शैलजा या महाराष्ट्रातल्या नाशिकला राहणाऱ्या आहेत. आतापर्यंत त्यांनी घडवलेल्या बऱ्याच खेळाडूंना पुरस्कारही मिळाले आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, भारतात मी क्रीडा व युवक कल्याण संचालनालयात प्रशिक्षक म्हणून काम करत होते. एनआयएस प्रशिक्षक म्हणून काम करताना भारतात मात्र प्रशिक्षकपदाची संधी मिळाली नाही. बरीच वर्षे ठराविकच महिला भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद भूषवत आहेत. इतरांना कधी संधी मिळणार? पण मी ते सिद्ध करून दाखवले की भारतात गुणवत्ता आहे. इराणच्या महिलांना मिळालेले सुवर्ण हा त्याचा दाखला आहे.
इराणने 2008 साली शैलजा यांच्याशी संपर्क साधला होता. पण त्यावेळी शैलजा या नोकरी करत होत्या. शैलजा निवृत्त झाल्या आणि इराणने पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मात्र शैलजा यांनी इराणला जायचे ठरवले. इराणमध्ये गेल्यावर आहार ते वेशभूषा या साऱ्या गोष्टींमध्ये त्यांच्या आयुष्यात फरक पडला. पण यावेळी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य इराणने दिले होते. संघ निवडीपासून ते कोणत्या खेळाडूला कधी खेळवायचं, हे सारे निर्णय शैलजा घेत होत्या. त्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे इराणने सुवर्णपदक जिंकले, असे शैलजा सांगत होत्या.
तसेच सामन्या बद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, इराणच्या महिला या रग्बी, फुटबॉल, मार्शल आर्ट खेळत असल्यामुळे आधीच तंदुरुस्त आहेत. त्याची जोड कबड्डीला मिळाली. भारताविरुद्ध आम्ही पिछाडीवर होतो पण मला भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे दिसत होते. मी आमच्या खेळाडूंना टाइमआऊटदरम्यान बोनसवर भर देण्यास सांगितले. शिवाय, आम्ही तैपेईविरुद्ध जो पराभव सहन केला, त्यातूनही आम्हाला धडा मिळाला. थायलंडविरुद्ध भारत कमी फरकाने जिंकला. त्यावरून मी काही आडाखे बांधले. त्यातच भारतीय कबड्डी फेडरेशनमध्ये सध्या वादविवाद सुरू आहेत. त्याचाही फटका भारतीय संघाला बसला. भारतीय पुरुष संघ पराभूत झाल्यामुळे तर महिलांवर प्रचंड दबाव आला होता त्याचाच फायदा आम्ही उचलला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)