इम्रान खान; विश्‍वचषक विजेता कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधान?

इस्लामाबाद – इम्रानचा क्रिकेटपटू ते पाकिस्तानचा पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास जबरदस्त आहे. क्रिकेट खेळत असताना इम्रान हा त्याच्या सहकाऱ्यांमध्ये एक चांगला टीम लिडर म्हणून लोकप्रिय होता. त्याची खेळाडूंची पारख करण्याचे, आघाडीवर राहून नेतृत्व करण्याचे किस्से आजही सांगितले जातात. राजकारणात उतरल्यावर हेच गुण त्याला उपयुक्त ठरले आणि तो अल्पावधीतच टीम लिडरपासून नॅशनल लिडर बनला आहे.

1992 साली पाकिस्तानला विश्‍वचषक जिंकून दिल्यानंतर इम्रान खान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. त्यानंतर त्याने 1996 मध्ये पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला शरीफ आणि भुत्तोंच्या पक्षांचे पाकिस्तानमधील जनमानसात असलेले वर्चस्व आणि जनरल मुशर्रफ यांची हुकूमशाही राजवट यामुळे इम्रानच्या पक्षाला फारसा वाव मिळाला नाही. 2002 साली झालेल्या निवडणुकांमधुन तो पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संसदेत निवडून गेला. तर 2013 साली खैबर पख्तुनवा प्रांताची सत्ता मिळाल्यानंतर त्याचा पक्ष वेगाने वाढला. त्यानंतर एकाच वर्षाने इम्रानने पाकिस्तान मुस्लीम लिगचे अध्यक्ष नवाज शरीफ यांच्यावर मतदान प्रक्रीयेत भ्रष्टचार केल्याचे आरोप करत त्यांच्या राजिनाम्याची मागणी करत आंदोलन केले. त्यानंतर त्याने ताहिर उल कादरी या पाकिस्तानात जन्मलेल्या कॅनदा वासिया सोबत युती करत सरकारच्या विरोधात आक्रमक पणे आंदोलन केले. त्यानंतर शरीफ सरकारने या संदर्भात न्यायालयीन चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची तयारी दर्शविल्या नंतर त्यांनी हे आंदोलन स्थगीत केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2018 च्या निवडणुकी दरम्यान झालेल्या आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान, खान यांनी भ्रष्टाचारविरोधी कारवाई, दारिद्रय निर्मूलन, आरोग्यसेवा आणि शिक्षण सुधारणे तसेच देश बळकट करण्याचे वचन दिले. इम्रानचे जहाल विचार आणि आक्रमकतेमुळे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा त्याला छुपा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जाते. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर नवाझ शरीफ यांना झालेली शिक्षा आणि अन्य प्रतिस्पर्धी बिलावत भुत्तो यांचे अपरिपक्व नेतृत्व इम्रान खान आणि त्याच्या पक्षाच्या पथ्यावर पडले.

इम्रानचे व्यक्तिमत्त्व काहीसे रंगेल स्वरुपाचे आहे. अनेक महिलांशी असलेल्या त्याच्या संबंधाची अनेकदा चर्चा झाली. त्याचे वैवाहिक जीवनही तितकेच वादळी राहिले. तर त्याने कर्करोगाने मृत्युमुखी पडलेल्या आपल्या आईच्या स्मरणार्थ कॅन्सर रुग्णालय उभारून त्याने जनसेवेचा आदर्श निर्माण केला होता. पुढच्या काळाता पाकिस्तानी राजकारण भ्रष्टाचार आणि परिवारवादामध्ये गुंतल्यानंतर इम्रान हाच पाकिस्तानी जनतेसाठी आश्वासक चेहरा म्हणून पुढे आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)