इन्स्टाग्रामच्या संस्थापकांनी केला फेसबुकला रामराम

कॅलिफोर्निया – सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो आणि व्हिडिओ शेअरींगसाठी लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामच्या संस्थापकांनी फेसबुक कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉटस्‌ऍपनंतर इन्स्टाग्रामच्या संस्थापकांनी घेतलेल्या या निर्णयाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

इन्स्टाग्रामची सुरुवात आठ वर्षांपूर्वी केविन सिस्ट्रॉम आणि माइक क्रेगर यांनी केली होती. त्यानंतर दोनच वर्षांत इन्स्टाग्राम फेसबुकला विकण्यात आली. इन्स्टाग्रामला फेसबुकने 2012 मध्ये तब्बल 7 हजार 200 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तेव्हापासून दोघेही फेसबुकमध्येच इन्स्टाग्रामची जबाबदारी सांभाळत होते. मात्र त्यांनी कंपनीतून बाहेर पडण्याचे कारण काय आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी व्हॉटस्‌ऍपचे सहसंस्थापकांनीही कंपनी सोडली आहे. आता त्याच पद्धतीने इन्स्टाग्रामचे संस्थापकही बाहेर पडणार आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून मतभेद सुरु आहेत. फेसबुकने इन्स्टाग्राम विकत घेताना स्वतंत्रपणे काम करु देण्याची मुभा दिली होती. मात्र, आता त्यावर बंधने आल्याने हा निर्णय घेतला गेला असल्याचे टेक क्रंचने म्हटले आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि इन्स्टाग्रामचे संस्थापक सिस्ट्रॉम यांचा एकमेकांशी चांगला समन्वय होता. मात्र, त्यांच्यात अनेक बाबींवर मतभेद असत. कोणतीही गोष्ट ठीक करण्यापूर्वी त्यांच्यात वादही झाले आहेत. यात इन्स्टाग्राम पोस्टस्‌ फेसबुकवर शेअर करण्याबाबतचा मुद्दाही आहे. झुकेरबर्गला इन्स्टाग्रामच्या पोस्ट फेसबुकवरही याव्यात असे वाटत होते. या गोष्टीला सिस्ट्रॉमचा विरोध होता.

इन्स्टाग्रामच्या ब्लॉगवर दोन्ही संस्थापकांनी म्हटले आहे की, आमच्या कल्पनाशक्तीचा विस्तार करण्यासाठी आम्ही काही वेळ घेत आहोत. मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे जाणे गरजेचे आहे. यामधून आम्हाला समजेल की जगाला आमच्याकडून काय हवे आहे. तसेच आम्हाला कशातून प्रेरणा मिळते हेसुद्धा जाणून घ्यायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)