इनाम जमिनीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

  • किसान सभेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

मंचर  – ब्रिटीशकाळापासून देवस्थान, मस्जिद यांची देखभाल करणाऱ्या कुटुंबांना जमीन इनाम स्वरुपात देण्यात आल्या होत्या. इनाम वर्ग 3 या जमिनीवर कुटुंबे आपला उदरनिर्वाह करीत आहेत, परंतु ही जमीन या शेतकऱ्यांच्या नावाने नसल्याने त्यांना कोणतीच शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. सदर जमिनी नावावर होण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान सभेच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रश्‍नांविषयी सविस्तर चर्चा करुन मागण्यांचे निवेदन सादर केले.
देखभाल करण्याऱ्या शेतकऱ्यांची जी नावे कब्जेदार म्हणून होती ती नावे ही आता रद्द करण्यात आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर किसान सभेच्या वतीने संपूर्ण राज्यभर इनाम वर्ग 3च्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे व्हाव्यात, यासाठी लढा सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, किसान सभेचे राज्य पदाधिकारी उमेश देशमुख, सिटूचे पुणे जिल्हा सचिव वसंत पवार, डॉ. ज्ञानेश्‍वर मोटे, डॉ. किशोर खिलारे आदी उपस्थित होते. आंदोलनाचे संयोजन किसान सभेचे ऍड. नाथा शिंगाडे, अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे, विश्‍वनाथ निगळे, लक्ष्मण जोशी, दिगंबर कांबळे, लक्ष्मण मावळे व युवराज घोगरे यांनी केले. जिल्ह्यातून शिरुर, मावळ, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड या सहा तालुक्‍यातून सुमारे सहाशे शेतकरी बांधवांना सहभागी करण्यामध्ये असिफ इनामदार, जुईली शेख आणि इनाम वर्ग 3ची जमीन कसणारे शेतकरी यांनी भूमिका पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.