चिंचवड – ऐतिहासिक काळात दृक-श्राव्य माध्यमांची कमतरता होती. मात्र. तरीदेखील अश कोणतीही साधने उपलब्ध नसताना खरा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम शाहिरांनी केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ यांनी केले.
महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्या महोत्सवांतर्गत शाहिरी शिववंदना या कार्यक्रमात प्रभाकर ओव्हाळ बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेविका उषा वाघेरे, नगरसेविका अश्विनी बोबडे, स्वागताध्यक्ष भीमा बोबडे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्यवाह शाहीर प्रकाश ढवळे आणि उपाध्यक्ष बाळासाहेब काळजे उपस्थित होते.
ओव्हाळ पुढे म्हणाले की, लोककलेत शाहिरीचा सहभाग खूप मोठा आहे. प्रतापगडाच्या रणसंग्रामात प्रत्यक्षदर्शी असलेल्या अज्ञानदासाने जिजाऊ मॉंसाहेबांच्या आज्ञेनुसार 36 कवनांच्या पोवाड्यातून शौर्याचा इतिहास कथन केला. त्या वेळेपासून निर्माण झालेली शाहिरी परंपरा आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे.
शाहीर प्रकाश ढवळे यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात असलेल्या शाहिरीकलेचे पुनरुज्जीवन स्व. शाहीर योगेश आणि स्व. शाहीर किसनराव हिंगे यांनी केले. पन्नास वर्षांच्या काळात चांदा ते बांदा अशा संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे अडीच हजार शाहिरी पथके कार्यरत असून शासनाने त्यांना उचित सन्मान द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी समर्थ रामदास स्वामी रचित शिववंदनेचे सामूदायिक पठन करण्यात आले. गेली चाळीस वर्षांपासून शाहिरी कलेत ढोलकी आणि हार्मोनियम वादन करणाऱ्या राजाभाऊ गायकवाड, हेरंब चिंचणीकर, अर्जुन नेटके, उद्धव गुरव, उल्हास पिलवळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
त्यानंतर झालेल्या पोवाड्यांच्या कार्यक्रमात बालशाहीर प्रथमेश थोरात, हृषीकेश मोतीवाले, प्रीतम, मकरंद यांनी स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण, महाराष्ट्रवर्णन, अफजलखान वध अशा विविध विषयांवरील पोवाड्यांचे प्रभावी सादरीकरण केले. शाहीर बाळासाहेब काळजे यांनी आपल्या पहाडी आवाजातून सादर केलेल्या सिंहगडाच्या पोवाड्याने श्रोत्यांना वीरश्रीचा प्रत्यय दिला.
शाहीर प्रकाश ढवळे यांनी अभ्यासपूर्ण निवेदन करीत गणवंदना, मुजरा, शिवबांचे कवन सादर करून वातावरण भारून टाकले. अतिशय रंगतदार झालेल्या पोवाड्यांच्या या सत्राचा समारोप शाहिरा अलका जोशी आणि महिला शाहिरांनी सादर केलेल्या शिवराज्याभिषेकगीताने केला. मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत बालशाहिराना रोख बक्षिसे दिली.
शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले.संतोष गोलांडे, राजेंद्र आहेर, वनिता मोहिते, प्रचिती भिष्णुरकर, काशिनाथ दीक्षित, दीपक कुलकर्णी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. पिंपरीगावातील अखिल शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते