इंधन दरवाढीतून दुहेरी लूट (भाग- २)

करांमधून होणाऱ्या दरवाढीव्यतिरिक्त पेट्रोल – डिझेलची किंमत कशी वाढते ते खालील तक्‍त्यातून कळून येईल. पेट्रोल डिझेलची किंमत ठरवताना कंपन्यांना पूर्णपणे स्वातंत्र दिले आहे आणि त्यावर सरकारचे कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे सरकारी आणि खासगी तेल कंपन्यांनी हे दर ठरवण्याची पद्धत स्वतःच्या सोयीची बनवली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूची किंमत ही कच्च्या मालाची किंमत, प्रक्रिया खर्च आणि त्यावरील वाजवी नफा यांनी मिळून बनते असे आपण मानतो. तेलाच्या किमतीही तशाच ठरत असतील असा आपला भाबडा गैरसमज आहे. पण वस्तुस्थिती वेगळी आहे.

आपण शुद्धीकरण केलेले तयार पेट्रोल-डिझेल आयात करत नाही. तरीदेखील ते आयात केलेले आहे असे काल्पनिकरित्या गृहित धरून जर ते आयात केले असते तर भारताच्या किनाऱ्यावर शुद्धीकृत पेट्रोल- डिझेलची किंमत काय झाली असती याचा विचार करून ती किंमत पायाभूत धऱली जाते. तेल कंपन्या त्याच किंमतीला पेट्रोल आणि डिझेल मार्केटिंग कंपन्यांना विकतात. कच्च्या क्रूड तेलाची किंमत आणि प्रक्रिया खर्च मिळून येणाऱ्या किमतीपेक्षा ही किंमत प्रचंड प्रमाणात जास्त असते. त्यामुळेच तेल शुद्धीकरण कंपन्यांचा वाजवी नफा विचारात घेतला तरीदेखील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे प्रतिलिटर 10 रुपयांनी जास्त आहेत. याचाच अर्थ आज तेल कंपन्या वाजवी नफ्याव्यतिरिक्त 10 रुपयांची लूट अधिक करताहेत. म्हणूनच तेलाची किंमत निर्धारणाची पद्धतच मुळात विपरित आहे.

भारताच्या भूमीवर भारतात शुद्धीकरण झालेले पेट्रोल आणि डिझेल भारतातल्या कंपनीला विकत असताना आंतरराष्ट्रीय किंमत काल्पनिक लावणे हे कोणत्याही तर्कात बसणारे नाही. हाच न्याय शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेताना लावला जातो का? कामगारांना वेतन देताना तसे दिले जाते का? असे करायचे असेल तर भारताच्या आर्थिक सीमाच काढून टाका. जागतिकीकरण म्हणजे लोकांची लूट करण्याचा सोयीस्कर परवाना नव्हे. त्यामुळे ही पद्धती अत्यंत घातक आहे. देशातील रिलायन्स आणि एस्सार या दोन खासगी पेट्रोल कंपन्यांच्या सोयीसाठी हे केलेले असून आता त्याचा फायदा सरकारी कंपन्याही उठवत आहेत. थोडक्‍यात, तेल शुद्धीकरण कंपन्या आणि कर या दोन्हींच्या नावाने सरकार दोन्ही हातांनी जनतेची लूट करत आहे. ही लूट बंद झाली पाहिजे. हे धोरण मुळातून बदलले तर तेलाच्या किमती आटोक्‍यात येतील हे नक्की.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण सोबत दिलेली सूची पाहिल्यास गेल्या चार वर्षांमध्ये म्हणजे मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून क्रूड तेलाचे भाव कसे बदलले याविषयीची माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर या चार वर्षांच्या काळात पेट्रोल आणि डिझेल यांचे प्रत्यक्ष भाव (पेट्रोल पंपांवरील) कसे राहिले आहेत याचीही माहिती या सूचीमधून मिळू शकेल. या सूचीवरून आपल्याला असे दिसून येईल की, जेव्हा कच्च्या क्रूड तेलाचा भारताच्या आयातीचा दर एका बॅरलला 106 डॉलर असताना भारतामध्ये पेट्रोल पंपावर 80 रुपये लिटर या दराने पेट्रोल मिळत होते.

आता हेच भाव 77 डॉलर प्रति बॅऱल आहेत. म्हणजेच सरकार हे भाव वाढत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात ते कमी झालेले आहेत. असे असूनही आपण आज 85 रुपये प्रतिलिटर या दराने पेट्रोल घेत आहोत. यावरून सरकार आणि भारतीय जनता पक्ष जनतेची कशी फसवणूक करताहेत हे लक्षात येईल.

कॉ. अजित अभ्यंकर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)