इंद्रायणी थडीमध्ये पहिल्याच दिवशी सुमारे 88 लाखांची उलाढाल

भोसरी– भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी थडी या ग्रामीण महोत्सवाला शुक्रवारी पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून एकाच दिवसात विक्रमी सुमारे तीस हजार लोकांनी भेट दिली. येथे असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलना पसंतीची विशेष पावती मिळाली असून त्यामुळे ते चालवणाऱ्या महिला बचत गटांना मोठे पाठबळ मिळाले आहे. या एकाच दिवसात सुमारे 88 लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली असून पुढील तीन दिवसात हा आकडा कोटींची टप्पा पार करेल असा विश्‍वास आयोजकांना व्यिक्‍त केला आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करायला लावणारा “इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात आला आहे. हा महोत्सव भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर 11 फेब्रुवारीपर्यंत सुरु असून, शनिवारी (दि.9) महोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी येथे असलेल्या महिला बचत गटांच्या विविध स्टॉलवरील खाद्यपदार्थांचे, शोभेच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

याठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातील खाद्यसंस्कृती दर्शवणारे अनेक स्टॉल्स आहेत. यात कोकणी, मालवणी, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेशातील खाद्यसंस्कृती दर्शवणारे शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे विविध स्टॉल्स आहेत. त्यात मासवडी, खानदेशी पुरणपोळी अर्थात मांडा, मालवणी फिश या स्टॉल्सना लोकांची विशेष पसंती मिळत आहे. त्या स्टॉल्सला नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असून, आपल्या भागाची स्पेशल चव दाखवण्याची संधी या निमित्ताने या सुगरणींना मिळत आहे.

येथे खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससोबत महिला बचतगटांनी तयार केलेल्या हॅन्डमेड वस्तूंचे देखील भरपूर स्टॉल्स आहेत. भोसरी मतदारसंघातील या महिला बचतगटांना या निमित्ताने एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यांना आपली कला लोकांसमोर मांडण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे. तसेच येथे बालजत्रा, जुनी खेड्यांची रचना दर्शवणारी ग्रामसंस्कृती, शिवकाळातील जुनी शस्त्रात्रे दाखवणारे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन येथे आहे.
या महोत्सवाला भेट देण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली असून आज सकाळपासून दुपारपर्यंतच पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली. तसेच उद्या रविवार असल्याने ही गर्दी वाढून गर्दीचा उच्चांक होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.