“इंद्रायणी’ला पुन्हा महापूर

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : आळंदीतील नवीन पूल वाहतुकीसाठी बंद

आळंदी- गेल्या दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आळंदी परिसरात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 48 तासांत परिसराला दमदार पावसाने झोडपले असून मावळ तालुक्‍यातही दमदार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीने पुन्हा महापूर आल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

येत्या 48 तासांत पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आळंदीतील जूना व नवीन पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने इंद्रायणी नदीला महापूर आला असल्याने घाटावरील नित्याचे धार्मिक विधी बंद झाले आहेत. तर नवीन पूल व जुना पूल यावरून पाणी जाण्यास केवळ दोन फुटाचे अंतर उरले आहे. त्यामुळे आळंदी नगरपरिषद, आळंदी देवाची, दिघी पोलीस ठाणे व महसूल विभाग खेड (आळंदी) यांच्यावतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नवीन पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आळंदीत इंद्रायणीतील भक्‍ती सोपान पूल, भक्‍त पुंडलिक, शनी, मारुती मंदिर पाण्याखाली गेले आहेत. तर पान-फुलांच्या दुकांनात पाणी शिरल्याने ते बंद करण्यात आली आहेत. तर तब्बल 13 वर्षानंतर पुन्हा एकदा नवीन व जुन्या पुलावरून पाणी जाईल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. तर इंद्रायणी घाटावर भाविकांनी स्नानासाठी जाऊ नये, असा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

दुबार पेरणीचे संकट टळले
गेल्या महिन्यात आळंदी आणि मावळ तालुक्‍यात दमदार पाऊस पडल्याने इंद्रायणीला महापूर आला होता, त्यावेळी शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास प्रारंभ केला होता. मात्र, त्यानंतर दोन आठवडे पावसाने विश्रांती घेतल्याने दुबारपेरणीचे संकट ओढवले होते. मात्र, आता गेल्या 48 तासांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.