‘इंद्रायणी’काठी वैष्णवांची दाटी’ ‘काय वर्णावा सोहळ्याचा थाट’…

वैष्णवांनी व्यक्‍त केली भावना


सोहळ्यासह 400 पेक्षा अधिक दिंड्या झाल्या मार्गस्थ


आज प्रस्थान ठेविले

ज्ञानियाच्या द्वारी।
उद्या सकलजण जाणार
विठुच्या नगरी।।
“काय वर्णावा सोहळ्याचा थाट, माउलींच्या संगतीने धरली पंढरीची वाट’… सर्वोच्च भक्‍तीची अनुभूती नक्‍की काय असते अन्‌ सोहळ्याचा दिमाखही काय असतो, “याची देही याची डोळा’ प्रचिती अलंकापुरीत
मिळाल्याची भवना अनेक वैष्णवांनी व्यक्‍त केली.

कपाळी बुक्‍का, खांद्यावरील भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णव गेल्या दोन-तीन दिवसांपासून आळंदीत दाखल झाले असून आज त्याचा उच्चांक गाठल्याने इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर आणि अवघी अलंकापुरी टाळ-मृदंगाचा गजर आणि माऊली नामाच्या अखंड जयघोषाने मंगळवारी (दि. 25) दुमदुमली होती.

कोण कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, पंथाचा कोणालाही माहित नाही. कोणाला आमंत्रण नसताना हे सर्व जण एकत्र येऊन फेर धरून नाचले. ज्ञानोबा-माऊलीचा जयघोष करत माउलींच्या प्रस्थानात तल्लीन झाले होते, त्यामुळे इंद्रायणी नदीकाठी भक्‍तीरसाच्या लाटा उसळल्या होत्या. गगनभेदी तुतारिचा निनाद, टाळ-मृदंगाची जुगलबंदी, आसमंत उजाळून टाकणाऱ्या सांप्रदायिक भगव्या पताका आणि माऊली-माऊलीचा सतत होणारा जयघोष असे माऊलीमय वातावरण अलंकापुरीत प्रस्थानानिमित्त पहायला मिळाले. दरम्यान, या सोहळ्यात दाखल झालेल्या 400 पेक्षा अधिक दिंड्यांनी माउलींच्या पालखोसोबत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. आज सकाळपासून ऊन-सावलीचा खेळासोबत ढगाळ वातावरण होते त्यामुळे वरुणराजा बरसेल अशी आशा होती मात्र, ही आशा फोल ठरली. तर पालखी विणा मंदिरात बाहेर आली त्यावेळी वरुणराजाने थोडाका होईना शिडकावा केला. वरुणराजाच्या शिडकाव्याप्रसंगी माउलींचा एक जयघोष करण्यात आला. पालखीचे आळंदीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. पालखी प्रस्थानानंतर आळंदीत अनेक ठिकाणी विविध मंडळे व दानशूर व्यक्‍तींनी अन्नदान केले.

सेल्फीची क्रेझ कायम
वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण इंद्रायणी परिसर गजबजला होता. इंद्रायणी तिरावर विविध दिंड्या भजन, भारूड अन्‌ माऊलींचा जयघोष अखंड होता. डोक्‍यावर मोर पिसारा असलेली टोपी घातलेल्या वासुदेवांचा गजर सुरू होता तर भक्ती रसात तल्लिन झालेल्या महिला पुरूष वारकरी फुगड्या खेळत होते. वारकऱ्यांचे खेळ मोबाईल, कॅमेऱ्यात टिपण्यासठी तरुणांनी गर्दी केली होती. तर अनेक तरुण-तरुणी व हौसी वारकऱ्यांबरोबर सेल्फी काढून घेत होते.

दर्शनासाठी आजोळ घरी ग्रामस्थांच्या रांगा
माउलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान ठेवल्यानंतर मंगळवार (दि. 25) चा मुक्‍काम आजोळघरी होता. तर बुधवारी (दि. 26) सकाळी सहा वाजता पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे लाडक्‍या माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आळंदीकर ग्रामस्थ व आसपासच्या गावातील नागिरकांनी रात्री उशिरपर्यंत रांग लावली होती. याशिवाय मानाच्या अश्‍वांचा मुक्‍काम असलेल्या फुलवाले धर्मशाळेतही या अश्‍वांचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

देवसंस्थानकडून दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख
महसूलमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वी मंगळवारी (दि. 25) दुपारी 12 वाजता माऊली मंदिरास भेट दिली. राज्यात दुष्काळाचे सावट असल्यामुळे कोणताही सत्कार घेणार किंवा स्वीकारणार नाही असे सर्वप्रथम आळंदी नगरपरिषद तसेच श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान यांना सांगितले. दरम्यान, देवसंस्थानच्या सुमारे 435 एकर गायरान जागेवरील शासनाने टाकलेले आरक्षण उठवल्याने चंद्रकांत पाटलांचे देवसंस्थानने आभार मानले व राज्यातील दुष्काळासाठी मुख्यमंत्री निधीकडे पाच लाखांचा धनादेश पाटलांकडे सुपूर्त केला. यावेळी आळंदी नगरपरिषद, खेड महसूल विभाग व आळंदी देवस्थान यांचे सर्व पदाधिकारी अधिकारी, भाविक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.