इंदापूर तालुक्‍यात आघाडीच्या चर्चेला जोर

भरणे- पाटील यांच्या प्रचारामुळे सुळेंचे मताधिक्‍य वाढले : भविष्यात समन्वय गरजेचा

पुणे- बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यातील लढत राज्यात गाजली. मात्र, गाऊंड लेवलवरील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडी धर्माचे पालन करून सुळे यांच्या मताधिक्‍यात वाढ केली आहे. यात कॉंग्रेसचा वाटा लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. तीन मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद असल्यामुळे राष्ट्रवादीच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. इंदापूर तालुक्‍यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीच्या मताधिक्‍यासाठी आघाडी घेतली. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातून 70 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. मात्र, भविष्यात या तीन मतदारसंघात आघाडी धर्माचे पालन करून समन्वयाचा तोडगा काढण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे. एकला चलो रेची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीला आता इंदापूर, भोर, पुरंदरमध्ये कॉंग्रेसला सोबत घ्यावे लागणार आहे, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर हा कळीचा मुद्दा झाला होता. इंदापूरच्या पाटील गडाकडे भाजप आस लाऊन बसला होता. मात्र, हर्षवर्धन पाटील यांच्याकडे अकलूजच्या प्रस्ताव येत असताना त्यांनी आघाडी धर्माचे पालन केले. त्यामुळे खासदार सुळे यांना 70 हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. यात माजी मंत्री पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे, प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारकटकर यांच्या नेटक्‍या प्रचाराने इंदापूरने आघाडी घेतली. ती विजयाप्रत पोहोचली. त्यामुळे येत्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरचा गड कोणाकडे झुकणार, याची चर्चा जोर धरू लागली आहे.
राज्यात लक्षवेधी लढतीमधील एक असलेली बारामतीचा आखाडा गेल्या तीन महिन्यांपासून चांगलाच तापला होता. या मतदारसंघात गेल्या 50 वर्षांत शरद पवार यांचे प्राबल्य राहिले आहे. 1967 पासून शरद पवार हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर बारामतीची जनता त्यांच्यावर विश्‍वासाची मोहोर उमटविली आहे. राज्याचे नेतृत्व करताना शरद पवार यांना गेल्या दहा वर्षांत आपल्या लेकीसाठी झगडावे लागल्याचे चित्र आहे.

बारामतीच्या मैदानात 1990 पूर्वी पवार विरोधकांची मोट विस्कळीत होती. या विस्कळीत मोटेची बांधणी करण्यात तत्कालीन (स्व) गोपीनाथ मुंढे यांनी यश मिळविले होते. 1991 नंतर पवार यांच्या विरोधात लढणाऱ्या अपक्ष उमेदवाराला एक लाखांवर मते मिळत होती. मात्र, 1996 नंतर मतदारसंघातील बेरजेचे आणि विरोधाचे राजकारण बदलत गेले. त्यात कांता नलवडे, पृथ्वीराज जाचक, काकडे यांनी आपले नशिब अजमावून पाहिले आहे. ग्रामीण आणि शहरी चेहरा असलेला हा मतदारसंघ आता बलाबलामध्ये फसला असल्याचे दिसून येत आहे. तसेच पक्षीय बलाबल ही राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी झाली आहे.

बारामती मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला, भोर विधानसभा मतदारसंघ येतात. पुनर्रचनेनंतर मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधकांची ताकद समान आहे. इंदापूर, भोरमध्ये कॉंग्रेसची ताकद लक्षवेधी आहे. त्यात पुरंदरमध्ये कॉंग्रेसचा गट हा राष्ट्रवादीत आणू शकतो. याची प्रचिती राष्ट्रवादीला दहा वर्षांत आली आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघातील खेळ राष्ट्रवादीच्या विजयात बिघाडी आणू शकतो, याची जाणीव हायकमांडला झाली आहे. पाडापाडीच्या राजकारणात आघाडी बेजार झाली आहे. त्याचा पुरेपूर लाभ हा भाजप- शिवसेनेने उठविला आहे.

खडकवासला, दौंड हे विरोधकांच्या ताब्यात आहेत. या दोन मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर, रासपचे आमदार राहुल कुल यांचे वर्चस्व आहे. या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीला समाधानकारक मताधिक्‍य मिळविता आले नाही. यात घरच्या मैदानातून उमेदवारी मिळाल्यामुळे दौंडच्या कुलांची मताधिक्‍य रोखण्यात बऱ्याचअंशी यश आले आहे. भीमा पाटसमुळे कुल बॅकफूटवर आले. त्याचा फटका भाजपला बसला आहे. इंदापूर, भोर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे यांचा विधानसभा मार्ग सुकर करणे गरजेचे आहे. तसेच पुरंदरमधील राष्ट्रवादीतील दुफळी आणि पाडापाडीचे राजकारण याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला आहे. पुरंदरच्या संजय जगताप यांनी यावेळी आघाडी धर्माचे तंतोतत पालन केले आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्‍यातून सुळे यांना मताधिक्‍य मिळाले आहे.

  • बारामतीचा फोकस हर्षवर्धन पाटलांवर
    लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर इंदापूरच्या निर्णयाकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले होते. हर्षवर्धन पाटील कोणती भूमिका घेणार, याविषयी तर्क- वितर्क लढविले जात होते. त्याचा परिणाम निकालावर होणार, अशी भाकिते वर्तविली जात होती. पाटील हे कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत होते. गतवेळचा रोष अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत होता. पाच वर्षांत आरोप- प्रत्यारोपाच्या फैरीत पाटील- भरणे गट व्यस्त झाला होता. यावेळची निवडणूक इंदापूरवरच लटकली होती. पाटील यांची भूमिका आणि कार्यकर्त्यांचा कल पाहता मताधिक्‍यांचीच चर्चा सुरू झाली होती. बारामतीची भाकरी फिरविण्यासाठी भाजपने देव पाण्यात ठेवले होते. त्यासाठी सर्व पर्यायांचा मार्ग अवलंबिला होता. या साडेतीन महिन्यांत संपूर्ण फोकस हा इंदापूरवर होता. सुळे यांच्या मताधिक्‍यांसाठी शरद पवार, अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचे परिवर्तन करण्यात यश मिळविले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी शेवटपर्यंत आघाडी धर्माची पताका खांद्यावर घेतली.
  • इंदापूरची उमेदवारी कोणाला?
    इंदापूर तालुक्‍यातील राजकारण शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्याभोवती फिरत आहे. 1995 पासून हर्षवर्धन पाटील यांनी सलग तीन टर्म आमदारकी भूषविली होती. मात्र, मागील लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी सुळे यांच्यासाठी आघाडी धर्म पाळला होता. त्यानंतर विधानसभेला आघाडी तुटली. त्यामुळे राष्ट्रवादीने भात्यातील दत्तात्रय भरणे यांचे अस्त्र सोडले. त्याचा फटका हर्षवर्धन पाटील यांना बसला आहे. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यात बारामतीचा गड राखण्यासाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी केली होती. त्यात इंदापूरची वजाबाकी भरून काढली. हर्षवर्धन पाटील यांनी साथ दिली. त्याचा लाभ हर्षवर्धन पाटील यांना मिळणार काय, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. भविष्यात राष्ट्रवादीला आघाडीतील संतुलन साधून समन्वयाची भूमिका निभवावी लागणार आहे. तरच पुढील पाच वर्षांनंतर बारामतीची सत्ता अबाधित ठेवता येणार आहे, हे मात्र, निश्‍चित.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.