इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी करणार आंदोलन

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील निरवांगी, दगडवाडी, बोराटवाडी गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई असून, नीरा डाव्या कालव्यातून फाटा क्रमांक 57 वरील दारे क्रमांक 9 व 17 आणि फाटा क्रमांक 54 वरील दारे क्रमांक 9 वर तिन्ही गावांची शेत भिजवण्यासाठी आज (दि. 4) आवर्तन असताना देखील अधिकाऱ्यांनी पाणी सोडले नाही. म्हणून तिन्ही गावांतील शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करून रस्ता रोको व प्रसंगी आमरण उपोषण करणारा असल्याचा इशारा दिला आहे.

निरवांगी व दगडवाडी (ता. इंदापूर) येथील शेकडो शेतकऱ्यांनी नीरा नदीमध्ये मागील वर्षी 23 मार्च 2018 रोजी आंदोलन केले होते, तरी देखील पाणी सोडण्यात आले नाही. मात्र, त्यावेळी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी कॅनॉलद्वारे शेतातील उभ्या पिकांसाठी पाणी सोडण्याचे मान्य केले होते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी इरिगेशनच्या चालू थकबाकीची सर्व पाणी पट्टी भरली. त्यांना चालू उन्हाळी हंगामात पाण्याचे आवर्तन मिळालेले नाही, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचा सूर असून, आवर्तन दोन दिवसांत सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

फाटा क्रमांक 57 वरील दारे क्रमांक 9 चे आवर्तन चालू झाले की, त्यानंतर 3 दिवसांनी फाटा क्रमांक 54 वरील दारे क्रमांक 9 वरील आवर्तन चालू करण्याची परंपरा चालू होती; परंतु अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे दगडवाडी व निरवांगी गावातील शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन पाणी सोडून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अन्यथा दोन्ही गावातील शेकडो शेतकरी सोमवार (दि. 6) सकाळी 9.30 वाजता निरवांगी एसटी सस्टॅंड समोर रस्ता रोको करणारा आहेत.

यावेळी अशोक पोळ, किसन भोसले, दत्तात्रय पोळ, राजेंद्र पोळ, मनोज निंबाळकर, रामभाऊ रासकर, लक्ष्मण निगडे, हरिदास देवकर, किसन गायकवाड, सुग्रीव रासकर, शंकर होळ, सोमनातब सुतार, विठ्ठल पोळ, वैभव जाधव, शहाजी होळ, बबन शेख यांनी सह्यानिशी निवेदन दिले आहे.

  • निरा डाव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता ‘नॉट रीचेबल’
    वरील दोन तीन गावातील शेतकरी पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांच्याकडे इंदापूर येथे आले. त्यावेळी पाटील यांनी निरा डाव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता धोपडकर यांना फोन लावला. त्यांच्या मोबाईलची रिंग खूप वेळ वाजली. त्यानंतर दुसऱ्या फोन लावाला असता त्या अधिकाऱ्याचा फोन स्वीच ऑफ लागत होता. त्यामुळे शेतकरी हताश होवून पुन्हा गावाकडे परतले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.