इंदापूर तालुक्‍यातील पाणीप्रश्‍न पेटणार

विद्यमान आमदारांचे अधिकारी एकेनात : पाटबंधारे विभागाकडून शेतकरी बेदखल

पळसदेव- उजनी धरणासह पुणे शहर परिसरातील धरणे शंभर टक्‍के भरली असताना इंदापूर तालुक्‍यातील तलावात पाणी सोडण्यात येत नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी पुरता भरडला जात आहे. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांविरोधात आता शेतकरी संघटनेने दंड थोपटले आहेत.

दरम्यान, इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी आणि नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत असताना अधिकाऱ्यांना पाझर फुटत नसल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, येत्या चार दिवसांत इंदापूर तालुक्‍यातील तलावात पाणी न सोडल्यास शेतकरी संघटना रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अनिल खोत यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात लाखो क्‍यूसेक पाणी कर्नाटकात वाहून गेले तरी देखील इंदापूरच्या तलावात पाणी सोडले नाही. शिवाय आमदार दत्तात्रय भरणे यांनी लेखी पत्र देऊनही अधिकारी त्याची दाखल घेत नाहीत. पाटबंधारे अधिकारी वठणीवर आणण्यासाठी पाटबंधारे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते यांच्या कार्यालयांसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

पाटबंधारे विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक इंदापूर तालुक्‍यावर अन्याय करीत आहेत. दोन्ही बाजूला दोन नद्यांना भरपूर पाणी आहे. मात्र, इंदापूर तालुक्‍याचा मध्यवर्ती भाग आजही पाण्यासाठी तडपडत आहे. इंदापूर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. कळस, पळसदेव, लोणी देवकर, भादलवाडी, अकोले भागात वनविभागाचे क्षेत्र अधिक आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्याचे वास्तव आहे . भादलवाडी तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षी वास्तव्य करतात .मात्र गेल्या अनेक महिन्यापासून हा तलाव कोरडाच असल्याने या भागातील पक्षांना स्तलांतर करण्याची वेळ आली . प्रसिद्ध असलेला तलावाची ओळख सध्या पुसण्याचा मार्गावर आहे.

पळसदेव येथील तलावावर 600 ते 700 एकर क्षेत्र आठमाही ओलिताखाली येते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना तळ्यात पाणी आल्यावर मोठा दिलासा मिळतो. मात्र, अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणांमुळे तलावात विहिरी खोदून पाणी मिळवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. इंदापूर तालुक्‍यातील अनेक तलाव कोरडेठाक पडल्यामुळे तलावाभोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. त्यामुळे तळ्याच्या काठावरील शेतकऱ्यांत वाद होत आहेत. हे वाद अधिक मोठे होण्याच्या आगोदर तलावात पाणी येणे गरजेचे आहे. तलावात लवकर पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना जनरेटा उभारणार असल्यामुळे भविष्यात इंदापूरचा पाणीप्रश्‍न पेटणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×