इंदापुरातील फुटीचा भाजपला होईल फायदा?

तालुक्‍यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी ऐवजी बिघाडीचेच वातावरण

– नीलकंठ मोहिते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेडा – इंदापूर तालुक्‍यात भारतीय जनता पक्षाला अद्यापही राजकीय दिव्यता आलेली नाही. परंतु, तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या गोंधळामुळे या पक्षांत मोठी फुट पडण्याच्या शक्‍यतेमुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांचे इंदापूर भाजपमध्ये “इनकमिंग’ होईल, असा आशावाद भाजपला आहे. यातून तालुक्‍यात ऐन निवडणुकीच्यावेळी भाजप आघाडीचा पक्ष होईल, अशी चर्चा आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होणार, हे निश्‍चित आहे. मात्र, इंदापूर तालुक्‍यांत आघाडीचे वातावरण या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना न पटणारे आहे. कारण, या ठिकाणी कॉंग्रेस हा राष्ट्रवादीचा मोठा विरोधक आहे. त्यातच माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे यावेळी मुख्यमंत्री पदाच्या रेसमधील उमेदवार आहेत. मी कॉंग्रेस पक्षाला तिकिट मागणार नाही. मला जनतेनेच 2019च्या विधानसभेसाठी उभे केले आहे, असेही छातीठोकपणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे सांगितले आहे. तर, आघाडी तुटली तरी चालेल परंतु, इंदापूर विधानसभेकरिता राष्ट्रवादीकडून आमदार भरणे हेच लढणार, अशी गर्जना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

शिवाय, इंदापुरातून विधानसभेसाठीच्या उमेदवारीकरिता इंदापूर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परीषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रविण माने आणि माजी आमदार कै.गणपतराव पाटील यांच्या सुनबाई जिल्हा परीषदेच्या सदस्या वैशाली पाटील यांनीही तयारी केली आहे. यामुळे आघाडीच्या मुद्यावर या दोन्ही पक्षात मतभेद होणार हे नक्की मानले जात असून या आघाडीत आताच काही राम राहिलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. यातूनही बारामतीचे पवार यांनी लोकसभेचा विचार करून या मतदार संघावर आपली क्रेज कायम ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.
परंतु, मान-अपमान या तागड्यातील तोलाईमुळे इंदापुरात राजकीय बेरंग होईल, असा पक्का अंदाज आहे.

राष्ट्रवादाच्या इच्छुकांपैकी एखादा ताकतवान आपल्या मागील गुप्त शक्ती घेऊन भाजपकडे झुकेल, असेही मानले जाते. मध्यंतरी लाखेवाडी येथिल एका कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व स्थानिक भाजप नेते एकत्र एका स्टेजवर आले होते, त्यावेळी उद्याचा आमदार भाजपचाच असेल, असे खुलेपणाने जाहीर केले होते. त्यातूनच भाजपने गळाला कोण लागतो, याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. आघाडी पाळत बसण्यापेक्षा केवळ उमेदवारी मिळवण्याकरिता इंदापुरातील नेते सरसावणार आणि तिकिटावरूनच होणाऱ्या फुटीचा फायदा भाजपला होणार आहे, असेच आताचे चित्र आहे. याच गणितातून भाजपने इंदापुर तालुक्‍यात एकही महत्त्वाचे पद दिलेले नाही, ही भाजपची खेळी मानली जात आहे.

आघाडीचे वातावरण कायम राहण्यासाठी…
इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी सर्वाधीक इच्छुक उमेदवार असलेला तालुका आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी कोट्यवधींचा निधी आणला तसेच हिमतीने संघर्ष करीत शेतकऱ्यांना पाण्याची आवर्तने दिली. मात्र, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भरणे यांच्या कामकाजावर तुफान टीका करीत भरणे निष्क्रिय आमदार असल्याचे टाहो फोडून या निष्क्रिय आमदाराची लिम्का बुकात नोंद करा..! असा टाहो फोडला. सध्याची ही अशी परिस्थिती पाहता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचे वातावरण कायम राखण्याकरिता माजीमंत्री पाटील आणि आमदार भरणे यांना प्रयत्न करावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)