इंदापुरवर वर्चस्व कोणत्या पाटलांचे?

लोकसभा निवडणूक कालावधीत इंदापुरात वठविली महत्त्वाची भूमिका
रेडा- लोकसभा निवडणुकीत आत्तापर्यंत कधीही इंदापूर तालुक्‍यात विरोधी उमेदवाराच्या बाजूने हवा नव्हती. परंतु, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या समर्थक सवंगड्यांना, कार्यकर्त्यांना भाजपला मदत करण्याचे आवाहन घरोघरी जाऊन केले होते. याला प्रतिसाद देत ज्या गावातून, ज्या भागातून कधीही भाजपला पसंती नव्हती. त्या भागात कमळाला मतदान केल्याचे खुलेआम बोलले जात आहे. यामुळे इंदापुरात खरे वर्चस्व कोणाचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे की माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे

याबाबत आता तालुक्‍यात खल सुरू झाला आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या परिवाराचा व इंदापूर तालुक्‍यातील सामान्य जनतेचा गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून अत्यंत जवळचा संपर्क आहे. मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या अकलूज सहकारी साखर कारखान्याचे तब्बल अर्धा डझन संचालक मंडळ इंदापूर तालुक्‍यातील कार्यक्षेत्रातील असतात, त्यामुळे इंदापुरच्या राजकारणावर विजयसिंह मोहिते पाटील यांचे कायमच वर्चस्व राहिलेले आहे.

इंदापूर तालुक्‍यातील नीरा नदी पात्रालगत असणारी जवळपास 20 ते 22 गावे मोहिते पाटील यांच्या सातत्याने विचाराची राहिलेले आहेत. या भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोहिते पाटील यांच्या आदेशाला मानणारे आहेत. इंदापूर तालुक्‍यात साखर कारखाना नव्हता, त्यावेळी इंदापुरातील सर्व ऊस अकलूज येथील सहकारी साखर कारखान्याला जात होता. याच माध्यमातून मोहिते-पाटील यांचे नेतृत्त्व सर्वमान्य झाले आणि मोहिते पाटील घराण्याचे आणि इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे ऋणानुबंध कायमचे जोडले गेले. याच कारणातून विजयदादा यांची राष्ट्रवादीने केलेली मानहानी इंदापुरात कोणालाही रूजली नसावी. त्यातच मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांची झालेली गुप्त बैठक इंदापुरातील जनतेला पाहिजे तो संदेश देऊन गेली. याच करणातून पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कॉंग्रेसचे नेते हषवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे यांना हाताशी धरून निवडणूक लढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

इंदापूर तालुक्‍यातील सातही जिल्हा परिषद गटात आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भाजपला परिपक्व साथ देण्याचा शब्द विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून भाजपने घेतल्याने मोहिते-पाटील यांनी केवळ अकलूजच नव्हे तर इंदापुरातील आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही मदतीचे आवाहन केले. विशेष म्हणजे, मोहिते पाटील यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांनीही त्यांचा शब्द पाळला आणि इंदापुरात अपेक्षित ते काम झाले.

राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे ऋणानुबंध तब्बल दोन ते तीन पिढ्यांचे आहेत. मध्यंतरी निवडणूक कालावधीत विजयसिंह मोहिते पाटील चहापानासाठी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गेले. परंतु, मीडियाने हर्षवर्धन पाटील हेच भाजपच्या वाटेवर असल्याचा बोलबाला केला, त्यामुळे मोहिते पाटील इंदापूर तालुक्‍यात कोणतेही वादळ कोणत्याही क्षणी घुमवू शकतात, हे त्यातूप स्पष्ट झाले. तसेच, महर्षी यांच्या जयंती सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अकलूजकरांच्या स्टेजवर इंदापुरचे आमदार भरणे यांना विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मानाचे स्थान दिले होते, त्यामुळे मोहिते-पाटील यांचे इंदापूर तालुक्‍यातील वर्चस्व त्यावेळीही अधोरेखीत झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.