इंदापुरकर पाजणार बारामतीकरांना पाणी

भाजपच्या उमदेवार कुल यांचा प्रचारादरम्यान निर्धार

भिगवण – बारामतीकर सत्ताधाऱ्यांनी केवळ आपल्याच तालुक्‍याचा किंबहुना काही भागाचा विकास करून मतदार संघातील इतर तालुक्‍यांवर सामाजिक व राजकीय अन्याय केला आहे; त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत इंदापूरकर त्याचा वचपा काढून बारामतीकरांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी सोमवारी भिगवण येथे आयोजित मेळाव्यात केला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप, शिवसेना, रा.स.प., शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, आर.पी.आय. महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. कांचन कुल यांनी आज इंदापूर तालुक्‍यात प्रचार केला. दौऱ्याचा प्रारंभ भिगवण येथे रॅली काढून झाला. तसेच कांचनताई यांनी सभा घेऊन इंदापुरकरांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष मारुतराव वणवे, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ऍड. राजेंद्र काळे, रासपचे प्रदेशउपाध्यक्ष दादासाहेब केसकर, भिगवनचे सरपंच तुकाराम बंडगर, तुकाराम काळे, अशोक पाचांगणे, अर्चनाताई पाटील, मेघनाताई बंडगर, अंकुशराव जाधव, निलेशराव देवकर, तेजस देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

रासपाचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर म्हणाले की, लोकसभेला आघाडी धर्माची आठवण करून विधानसभेला मात्र पाठीत खंजीर खुपसायचा हे राजकारण बारामतीकरांनी कॉंग्रेससोबत कायमच केले आहे. एकवेळ आघाडी तुटली तरी चालेल. पण, इंदापुरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडणार नाही, असे जाहीर वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. अशा स्वार्थी दुटप्पी राजकारणामुळे इंदापूर मधील कार्यकर्ता दुखावला आहे. यंदाच्या निवडणुकीत तो ठामपणे भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या पाठीमागे उभा आहे, असेही केसकर यांनी स्पष्ट केले. तसेच, हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. संपूर्ण इंदापुरचे रासपचे तसेच इतर महायुतीचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने प्रचाराला लागले असून इंदापूर मधून महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असल्याचे ही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.