‘इंजिनिअर’ लखोबा लोखंडे जेरबंद

जयेश संजय आडुळकर

 

पुणे :  उच्च शिक्षीत व आयटी कंपनीत कामाला असलेल्या एका तरुणाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. स्वस्तात दुचाकी, चारचाकी गाड्या तसेच मोबाइल आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तू देण्याचे आमिष दाखवत त्याने हा गंडा घातला. पुणेकरांना लाखो रुपयांचा गंडा घालून दिल्लीला पलायण करण्याच्या तयारीत असताना त्यास मुंढवा पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली.

धनकवडीतील महिलेला लाखोंचा चुना
धनकवडीतील एका महिलेशी फेसबुकवरून मैत्री करत त्याने बहीण मानले होते. यानंतर तिला कमी किंमतीत ऍक्‍टीव्हा गाडी घेऊन दिली होती. यानंतर तिच्या नातेवाईकांना आयफोन मोबाइल स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत 5 लाख रुपये घेतले. तसेच तिच्याकडून पैशाची गरज असल्याचे सांगत 16 तोळे दागिने घेऊन ते एकाकडे गहाण ठेवत 2 लाख रुपये घेतले. हे सोने हस्तगत करण्याची कारवाई पोलिसांकडून केली जात आहे.

आरोपीने येरवडा येथील कॉमर आयटी पार्क झोनमध्ये काम करत असल्याचे नागरिकांना सांगत होता. कंपनीतून मिळत असलेल्या डिस्काऊंटमधून फोर्ड एन्डेव्हर, व्हेर्ना अशा चारचाकी गाड्या तसेच टु-व्हिलर, महागडे मोबाइल, घड्याळे आदी वस्तु देण्याचे आमिष दाखवत त्याने खराडी व चंदननगर परिसरातील अनेकांना गंडा घातला आहे. त्याने अशाप्रकारे लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जयेश संजय आडुळकर (26) असे अटक आरोपीचे नाव आहे. घोरपडी येथे राहणारे संतोषकुमार बकाराम (35, रा. मुळ तेलंगणा) आणि सैन्यातून निवृत्त झालेले एम. एन. एस.रेड्डी (खराडी) यांची चांगली ओळख होती. यामुळे फिर्यादी बकाराम यांचे रेड्डी यांच्याकडे नेहमी येणे जाणे होते. रेड्डी हे “आयो रुम’चे मॅनेजर म्हणून काम करतात. दरम्यान, त्यांनी त्यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या जयेश आडुळकर यांची ओळख फिर्यादींशी करून दिली होती. त्यांनी फिर्यादीला नवीन बुलेट 75 हजाराला घेऊन देतो असे आमिष दाखवले होते. फिर्यादीने स्वत:साठी व मेव्हण्यासाठी 2 बुलेट घेण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी आरोपीने त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व बॅंक खात्यात 2 लाख 14 हजार 200 रुपये वर्ग करून घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतर तो मोबाइल बंद करून रुम सोडून निघून गेला. फिर्यादीने यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी तपास हाती घेतल्यावर आरोपी आडुळकरचे बॅंक खाते, आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे माहिती काढली असता तो काळेवाडीतील ज्योतीबानगर येथे रहात असल्याचे आढळले.                                 पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेतली असता तो तेथूनही घर सोडून गेल्याचे आढळले. दरम्यान त्यांच्या बॅंक खात्याची चौकशी केली असता, मागील काही दिवसांत मोठी रक्‍कम जमा झाल्याचे आढळले. ही रक्‍कम त्याने वेळोवेळी काढल्याचे आढळले. तो त्याचे सिमकार्ड वारंवार बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान, तो मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्‍त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्‍त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्‍त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव, पोलीस कर्मचारी प्रविण कांबळे, श्रीनाथ जाधव यांच्या पथकाने केली.

आयटी इंजिनिअर ते लखोबा लोखंडे
आरोपीने संगणकाची पदविका घेतली असून तो एका आयटी कंपनीत कामाला असल्याचे सांगतो. काळेवाडीत त्याचे घर असले तरी तो खराडीमध्ये खोली भाड्याने घेऊन रहात होता. फेसबुकवरून मैत्री करून त्याने अनेकांना गंडा घातला आहे. पिंपरीमध्ये त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे; तर लोणीकंदलाही एक गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो इनोसंट असल्याचे दाखवत गोड बोलून नागरिकांना जाळ्यात अडकवत होता. नागरिकांना विश्‍वास बसावा म्हणून तो सुरवातीला काही महिलांना दुचाकी गाडी स्वस्तात घेऊन देत होता. शोरुनमला गाडीची किंमत पूर्ण भरत असे मात्र समोरच्या व्यक्‍तीकडून पैसे घेताना 15 ते 20 हजार कमी घेत होता. यामुळे नागरिकांचा त्याच्यावर विश्‍वास बसून ते आपल्या नातेवाईकांचीही त्याच्याशी ओळख करून देत. यानंतर तो संबंधित नातेवाईकांकडून पैसे घेऊन पोबारा करत. फोर्ड एन्डेव्हर व व्हेर्ना गाड्या स्वस्तात देण्यासाठी त्याने अनेकांकडून 5 ते 10 लाख रुपये घेतले आहेत. त्यांच्या बॅंक खात्यात काही महिन्यात 50 ते 60 लाखांची रक्‍कम वर्ग झाल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. तो मागील 7 ते 8 महिन्यांपासून मुळ घरी गेला नव्हता तसेच त्याच्या मैत्रीनीलाही भेटला नव्हता. फसवले गेलेले नागरिक त्याच्या घरी खेटा घालत असल्याने तो घरी जाणे टाळत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)