आ. कोल्हे यांच्या राजीनाम्याचे वृत्त खोटे

बनावट लेटरहेडचा वापर; गुन्हे दाखल करणार
नगर – कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या राजीनाम्याचे वृत्त आज रात्री पसरले होते; परंतु त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त खोटे आहे. आपल्या लेटरपॅडचा दुरुपयोग केला असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर राज्यातील आमदारांनी राजीनामे देण्याचे सत्र सुरू आहे. नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या औरंगाबाद, सोलापूर व नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर राजीनामे दिल्याने राज्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातही राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आमदारांनी राजीनामे दिले. पुढच्या निवडणुकीसाठी मराठा मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी आमदारांनी राजीनामे देण्याचे नाट्य केल्याचे मानले जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीला अजून 14 महिने राहिले आहेत. अशावेळी आमदारांची ही कृती चर्चेचा विषय ठरली. विरोधक आमदारांनी राजीनामे दिल्याचे एक वेळ सरकारला अडचणीत आणणारे कृत्य ठरले आहे.
या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या राजीनाम्याचे वृत्त सर्वत्र पसरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागे ठामपणे उभ्या राहिलेल्या कोल्हे यांच्या राजीनाम्याचे वृत्त आले. त्यामुळे खळबळ उडाली. राजीनाम्याचे पत्रही “सोशल मीडिया’ तून प्रसिद्ध झाले. त्यातच कोल्हे या जंगली महाराज आश्रमाच्या कार्यक्रमात व्यस्त होत्या. त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे हे वृत्त खरे असावे असे वाटायला लागले. रात्री उशिरा त्यांच्यांशी संपर्क साधला गेला. तेव्हा राजीनाम्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगण्यात आले. कोल्हे यांचे बनावट लेटरहेड तयार करण्यात आले. त्यावर राजीनामा लिहिण्यात आला. श्रीमती कोल्हे यांची बनावट सही करण्यात आली. कोल्हे यांचे मूळ लेटरहेड व “सोशल मीडिया’ वर फिरत असलेल्या लेटरहेडमध्ये फरक आहे. श्रीमती कोल्हे यांचे काम चांगले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामावरही त्यांचा विश्‍वास आहे. अशा परिस्थितीत मुद्दाम खोडसाळपणा करण्यासाठी अशी बनवेगिरी करण्यात आल्याचा आरोप कोल्हे यांच्या प्रसिद्धी यंत्रणेने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)