आसा ( गया ) राम…

अभिजीत कुलकर्णी

जोधपूर न्यायालयाने सलमान खान नंतर आणखी एका कुकृत्य करणाऱ्याला सजा ठोठावली. आसाराम बापू या स्वयंघोषित ब्रह्मज्ञानी गृहस्थाला अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा मिळाली. शिक्षा सुनावल्यानंतर आसाराम बापू रडत असल्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले. वास्तविक,आसारामांसारखे कलंकित अध्यात्मी जेव्हा असे म्हणतात, की Raping girls is no sin for Brahmagyani& ( ब्रह्मज्ञानी लोकांना बलात्कार हे पाप नसते…) तेव्हा सामान्य भक्ताच्या पायाखालील वाळू सरकल्याशिवाय रहाणार नाही.

जे लोक श्रद्धेने आसाराम बापूच्या पायाशी भावनिक आश्रयाला आले, त्यांचे डोके हे ऐकून गरगरले असणार… यामुळे अध्यात्म क्षेत्राकडे श्रद्धेने पाहणाऱ्या लोकांच्या भावनेला तडा जाऊ शकतो, अशी स्थिती आहे. आसारामाच्या अत्यंत गलिच्छ आणि बिनडोक वाक्‍याला, त्याच्या घाणेरड्या आणि सडक्‍या कृतीला फाशी हाच किमान पर्याय आहे… अध्यात्माच्या क्षेत्रातही ही अवस्था म्हणजे कमाल आहे ! अशा बापू, भोंदू बाबांपासून चार हात लांब राहिलेले बरे, असे जनतेचे उद्गारही तेव्हा स्वाभाविक वाटतात…

थोड्या विस्ताराने पाहता,भारताला जुन्या काळापासून अध्यात्माचा वारसा आहे. बौद्ध धर्मातील झेन गुरु, भंते, ख्रिश्‍चन धर्मगुरू, जैन धर्मातील मुनिवर्य आणि हिंदू धर्मातील आचार्य,गुरु या सगळ्याकडे कोट्यावधी लोक, भक्त भावनेने जोडले गेले आहेत. आपल्या गुरूने घरी यावे, त्यांचे योग्य ते आदरातिथ्य व्हावे, त्यांनी आशीर्वाद द्यावेत, आणि त्यांच्या कृपेने प्रपंचात अनुकुलता (पैसा/ मुलेबाळे / बंगला/ गाडी/ जमीन/ स्थावर/ इस्टेट ) टिकून राहावी, असा भाबडा हेतू अनेक भक्तांचा असतो… अगदी, आसारामबापूंमुळे आमचा संसार सुरळीत सुरु झाला,असे म्हणणारे लोकही बहुसंख्येने भेटतील. यातले खरे काय नि खोटे काय, असा प्रश्नही अनेकांच्या मनात उमटेल… !

सातारा जिल्हा ही तर पुण्यात्म्यांची भूमी आहे. समस्त वारकरी संप्रदायाला काकडा, हरिपाठ,उपासनेची शिस्त घालून देणारे हैबतीबुवा आरफळकर हेही सातारा जिल्ह्यातले…सज्जनगड, सातारा, कराड, चाफळ, पुसेगाव, गोंदवले,कृष्णधाम या गावांची केवळ नावे जरी घेतली, तरी मनात एक शांतता आणि भगवंताच्या बद्दल असलेला भाव जागृत होतो.सातारा जिल्ह्यातले,परिसरातले अनेक भाविक महिन्या दोन महिन्याच्या अंतराने अशा स्थानाला भेटी देत असतात…रामदास स्वामी,ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, सेवागिरी महाराज, कृष्णदास महाराज, संत सखू, यांच्याखेरीज अनेक ज्ञात, अज्ञात सदगुरुनी अनेक भाविकांना खरे अध्यात्म म्हणजे काय ते सांगितले आहे. दुकानातून आपण नारळ विकत घेताना जसा वाजवून घेतो, तसा गुरु पारखून घ्या, अशी विनंती खुद्द या संतांनी केली आहे… तरीही बलात्कार म्हणजे पाप नाही, असे म्हणणाऱ्या आसारामासारख्या माणसाच्या माणूस नादी का लागतो? हा प्रश्न आहे…

कारण ब्रह्मज्ञानी सत्पुरुषाला देहातीत अनुभव येत असल्याने, शरीरधर्म हा केवळ जगण्याचे साधन आहे, इतकीच त्याची भावना असते… असा खरा ब्रह्मज्ञानी, लोकांपासून दूर राहतो. त्याला हजार कोटी रुपयांची इस्टेट टिकविण्याची गरज नसते. अन्न, वस्त्र आणि निवारा या किमान गरजा त्याला पुरतात…एखाद्या वेळेला त्या नसल्या तरी त्याची त्याविषयी तक्रार नसते.

याचाच अर्थ, न्यायव्यवस्थेपर्यंत त्या मुलीची किंकाळी पोचली, म्हणून आसाराम बापू के कारनामे जनतेला समजले. अनेक ठिकाणी असा भोंदू आणि स्वयंघोषित बाबांचा ‘देवाचा बाजार’ आजही सुरु असेल… आपण सावध आहोत का ? असा प्रश्न दररोज सकाळी स्वतःला विचारायला हवा…!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)