आसरे ग्रामसभा उधळण्याचा विरोधकांचा प्रयत्न

23 विषय मंजूर : प्रयत्न फसल्यावर विरोधकांची पंचायत समितीकडे धाव

कोरेगाव, दि. 30 (प्रतिनिधी) – आसरे, ता. कोरेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दि. 30 रोजी घेण्यात आलेली ग्रामसभा उधळण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. परंतु, ग्रामसभा पार पाडून 23 ठराव ग्रामसभेत मंजूर झाले. यानंतर विरोधी सदस्यांसह काही ग्रामस्थांनी कोरेगाव पंचायत समितीकडे धाव घेतली. गटविकास अधिकारी मगर यांनी मागणीनुसार पुन्हा ग्रामसभा घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर विरोधी सदस्यांसह ग्रामस्थ आसऱ्याकडे रवाना झाले.
आसरे या पुर्नवसित गावच्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा 30 रोजी सरपंच दिपक सणस यांच्या अध्यक्षते खाली नवलाई देवीच्या मंदिरात बोलवली होती. ग्रामपंचायतीवर सर्वपक्षीय सत्ता असून सत्ताधारी पक्षाचा सरपंच व उपसरपंचासह चार सदस्य आहेत तर विरोधीपक्षाचे चार सदस्य आहेत. निवडणुकीपासून गावात ग्रामसभेत गोंधळ होत असल्याने ग्रामसभेचे चित्रिकरण करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने स्व:खर्चाने व्हिडिओ शुटिंग मागवले होते. ग्रामसभेसाठी ग्रामस्थ येत होते. यावेळी 11.30 च्या दरम्यान कोरमआभावी ग्रामसभा तहकूब करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर सरपंचांनी काही वेळ ग्रामस्थ येण्याची वाट पाहू, असे सांगितले. काही वेळानंतर ग्रामस्थ येत असल्याचे पाहून ग्रामसभेचा कोरम पूर्ण होत असल्याची लक्षात येताच ग्रामस्थांच्या सह्याचे रजिस्टर हिसकावून घेवून ग्रामसभेची वेळ संपली आहे, सह्या करता येणार नाही, असा पवित्रा घेतला. परंतु, रजिस्टरवर जणांच्या सह्या झाल्याने व ग्रामसभेचा कोरम पुरा झाल्याने सरपंच दिपक सणस यांच्या आदेशाने ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्यात आले.
यानंतर निषेध व्यक्त करत चार सदस्यांसह काही ग्रामस्थांनी सभेचा त्याग करत कोरेगाव पोलिस स्टेशन गाठले व तक्रार दाखल करून घेण्याची विनंती कोरेगाव पो. नि. दादासाहेब चुडाप्पा यांना केली. चुडाप्पा यांनी ग्रामसभेचा विषय कोरेगाव पंचायत समितीच्या आणि गटविकास अधिकारी यांच्या अधिकारातील असून त्यांच्याकडे जाण्याच्या सुचना ग्रामस्थांना दिल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी कोरेगाव पंचायत समितीकडे धाव घेतली. पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी जिल्हा कार्यालयात महत्वपूर्ण बैठकीस गेले असल्याने गटविकास अधिकारी शरद मगर यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी ग्रामसभा घेण्यामधे काही चुक झाली असेल तर सविस्तर माहिती घेवून गरज पडलीतर पुन्हा ग्रामसभा घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपस्थित जमाव शांत झाला आणि घरी गेला.
दरम्यान, ग्रामसभेचे पुढील कामकाज 136 ग्रामस्थांच्या उपस्थितित सत्ताधारी सदस्यांनी सुरळीतपणे पार पाडले.सभेत 23 विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)