आशिया चषकासाठी भारत-बांगला देश झुंजणार 

दुखापतग्रस्त बांगला देशसमोर आज अपराजित “टीम इंडिया’चे आव्हान 
दुबई- आशिया खंडातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघासमोर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील उद्या (शुक्रवार) रंगणाऱ्या अंतिम सामन्यात बांगला देशचे आव्हान आहे. गेल्या काही वर्षांत कमालीची प्रगती केलेल्या बांगला देशला या लढतीत दुखापतींचा फटका बसला असून सलामीवीर तमिम इक्‍बाल आणि अष्टपैलू शकिब अल हसन यांची गैरहजेरी त्यांना निश्‍चितच जाणवणार आहे. 
भारतीय संघ विक्रमी सातव्यांदा आशिया चषक जिंकण्यासाठी सज्ज झाला असून त्यांना नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ही कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. याआधी दोन वेळा अंतिम फेरीत पराभूत झालेल्या बांगला देशला तिसऱ्या वेळी नशिबाची लाथ लाभण्याची आशा आहे. या लढतीत भारताला विजयासाठी पसंती देण्यात येत असली, तरी विश्‍वचषक स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीपासून उभय संघांमध्ये निर्माण झालेला कडवटपणा अजूनही संपलेला नसल्याने बांगला देश भारताला पराभूत करण्यासाठी उत्सुक आहे. 
अर्थात बांगला देशसमोरची आव्हाने सोपी नाहीत. पहिल्या गटसाखळी लढतीतच अफगाणिस्तानकडून पराभवाची नामुष्की ओढवल्यामुळे बांगला देशला फटका बसला होता. त्यातून सावरून अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना बांगला देशने आपली जिद्द आणि दर्जा सिद्ध केला. त्यातही उपान्त्य फेरीत पाकिस्तानवर मिळविलेल्या खणखणीत विजयामुळे बांगला देशची प्रतिष्ठा उंचावली आहे. राहुल द्रविडसारख्या महान खेळाडूनेही आशिया खंडात पाकिस्तान हा भारताचा अव्वल प्रतिस्पर्धी नसून बांगला देश आणि अफगाणिस्तान या संघांकडे लक्ष ठेवण्याची गरज असल्याचा इशारा दिला होता. 
मुश्‍फिकुर, महमुदुल्लाहवर मोठी जबाबदारी 
तरीही शकिबसारख्या खेळाडूच्या गैरहजेरीमुळे बांगला देश संघाला निश्‍चितपणे फटका बसणार आहे. शकिबच्या दुखापतग्रस्त बोटावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असून तो या महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावरही जाऊ शकणार नाही. तमिमसारख्या अनुभवी आणि आक्रमक सलामीवीराची उणीवही बांगला देशला चांगलीच जाणवणार आहे. उपान्त्य फेरीत 83 धावांची खेळी करणाऱ्या मुश्‍फिकुर रहीम व मोहम्मद मिथुन यांच्यासह अनुभवी महमुदुल्लाहला भारताविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे. तसेच लिटन दास व सौम्य सरकार या सलामीवीरांसमोरही भारतीय गोलंदाजांसमोर बांगला देशला मजबूत पायाभरणी करून देण्याचे आव्हान आहे. बांगला देशच्या आक्रमणाची मदार मुस्तफिझुर रहमानवर आहे. मुस्तफिझुरने उपान्त्य लढतीत पाकिस्तानविरुद्ध 4 बळी घेत बांगला देशला अंतिम फेरीत नेण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. उद्या अंतिम सामन्यातही भारतीय फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी त्याला उचलावी लागेल. मशर्रफ मोर्तझा फारसा यशस्वी ठरला नसला, तरी नवोदित मेहिदी हसन मिराझचा मारा भेदक असून भारतीय फलंदाजांना त्याच्यापासून सावध राहावे लागेल. 
भारताला गरज सांघिक कामगिरीची 
भारतीय संघाने या स्पर्धेत सर्वांगसुंदर कामगिरी केली आहे. रोहित शर्मा (269 धावा) आणि शिखर धवन (327 धावा) यांनी सलामीला अफलातून कामगिरी बजावली असली, तरी मधली फळी चाचपडत असल्याचे दिसून आले आहे. अंबाती रायुडूला चांगलय प्रारंभानंतर मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. तर ध्‌ोनी व केदार जाधव हेही आत्मविश्‍वासाने खेळताना दिसलेले नाहीत. संथ खेळपट्टीवर 250 धावांचे लक्ष्यही आव्हानात्मक ठरू शकणार असल्याने धोनीचा फॉर्म भारतासाठी निर्णायक ठरू शकेल. अफगाणिस्तानविरुद्ध राहुल व रायुडू यांनी शतकी सलामी दिल्यावरही भारतीय संघ कोसळला होता. बांगला देशचे आक्रमण अत्यंत भेदक असून त्यांनी पाकिस्तानला ज्या प्रकारे पराभूत केले, तो भारतासाठी धडाच ठरावा. भारतीय गोलंदाजांनाही मुश्‍फिकुर, मोहम्मद मिथुन, महमुदुल्लाह, मोर्तझा यांना रोखतानाच बांगला देशला गुंडाळण्याचे आव्हान पेलावे लागेल. उद्याच्या अंतिम लढतीत जसप्रीत बुमराह व भुवनेश्‍वरच्या वेगवान माऱ्याला कुलदीप, चाहल व जडेजाच्या फिरकीची आणि दर्जेदार क्षेत्ररक्षणाची साथ मिळणे गरजेचे आहे. 
 
प्रतिस्पर्धी संघ- 
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युझवेंद्र चाहल, दिनेश कार्तिक, दीपक चाहर, सिद्धार्थ कौल व खलील अहमद. 
बांगला देश- मशर्रफ मोर्तझा (कर्णधार), शकिब अल हसन, तमिम इक्‍बाल, लिट्टन कुमार दास, मोहम्मद मिथुन, मुश्‍फिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह रियाध, आरिफुल हक, मुस्तफिझुर रेहमान, रुबेल हुसेन, मेहिदी हसन मिराझ, मोसाडेक हुसेन, नझमुल इस्लाम, नझमुल हुसेन शांतो व अबू हैदर रॉनी. 
सामन्याचे ठिकाण- दुबई. सामन्याची वेळ- सायंकाळी 5-00 पासून 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)