आशियाई क्रीडा स्पर्धा : पुरुष व महिला तिरंदाजीत सांघिक रौप्यपदक

दोन्ही गटांत दक्षिण कोरियाकडून पराभव 
जकार्ता: भारताच्या महिला व पुरुष तिरंदाजी संघांना कंपाऊंड प्रकाराच्या अंतिम लढतीत दक्षिण कोरियाविरुद्ध अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर पराभव पत्करावा लागल्यामुळे आशियाई क्रीडास्पर्धेतील या दोन्ही क्रीडाप्रकारांमध्ये भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या दोन्ही गटांच्या अंतिम लढती अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचकारी ठरल्या. रीकर्व्ह गटातील अपयशानंतर कंपाऊंडमधील दोन सांघिक रौप्यपदकांमुळे तिरंदाजीतील भारताची कामगिरी उत्साहवर्धकच म्हणावी लागेल. परंतु त्याच वेळी दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक अखेरच्या क्षणी हुकल्यामुळे भारतीय गोटात हुरहुर होती.

भारतीय महिला संघाने दक्षिण कोरियाच्या महिला संघाला पहिल्या दोन सेटमध्ये जबरदस्त झुंज दिल्यानंतर निर्णायक चौथ्या सेटमध्ये चूक केल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु पुरुषांची अंतिम लढत चित्तथरारक ठरली. भारत व दक्षिण कोरिया या दोन्ही संघांमध्ये चौथ्या सेटअखेर बरोबरी झाल्यामुळे घेण्यात आलेल्या शूट-ऑफमध्येही बरोबरी झाल्यावर क्‍लिष्ट नियमानुसार दक्षिण कोरियाला सुवर्णपदक देण्यात आले. या ठिकाणी भारतीय पुरुष संघाला सरळसरळ नशिबाने हुलकावणी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरुषांच्या अंतिम फेरीत अभिषेक वर्मा, रजत चौहान व अमन सैनी यांच्या भारतीय संघाने 60 पैकी 60 गुणॉंची नोंद करीत दक्षिण कोरियाच्या (56) तुलनेत सरस कामगिरी केली. दुसऱ्या सेटमध्ये भारताची कामगिरी खालावली व त्यांना दक्षिण कोरियाच्या 58 गुणांच्या तुलनेत 54 गुणांचीच कमाई करता आली. त्यामुळे सामन्यात 114-114 अशी बरोबरी झाली. अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्या सेटमध्ये 58-56 अशी सरस कामगिरी करताना भारताने दोन गुणांची बहुमोल आघाडी घेतली.
अखेरचा सेट निर्णायक ठरणार हे निश्‍चित होते. अभिषेक वर्माने सातत्याने आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देतानाच आपली वैयक्‍तिक कामगिरीही उंचावीत ठेवली. त्याने अनेकदा 10 पॉइंटरची नोंद केली. परंतु पंचांनी त्याच्या दोन 10 पॉइंटरवर 10 ऐवजी 9 गुण दिले, तेव्हा गुणफलक पुन्हा एकदा 229-229 असा बरोबरीत आला. शूट-ऑफमध्ये भारताने 9-10-10 गुणांची नोंद केली. परंतु कोरियाने 10-9-10 असे गुण नोंदवीत 29-29 अशी बरोबरी साधली.

यावेळी भारतापेक्षा दक्षिण कोरियाचे अधिक 10 पॉइंटर “बुल्स आय’च्या नजीक असल्यामुळे त्यांना सुवर्णपदक बहाल करण्याचा निर्णय पंचांनी जाहीर करताच भारतीय खेळाडूंना धक्‍काच बसला. हा केवळ नशिबाचाच खेळ होता. अशा अंतिम लढतीत तुम्ही यापेक्षा जास्त काय अपेक्षा करणार, असा सवाल करून अभिषेक वर्मा म्हणाला की, वाऱ्याचा वेग व दिशा यामुळेही लढतीचा निर्णय निश्‍चित होत असतो.

महिला गटांत कोरयिाची बाजी

महिलांच्या अंतिम फेरीत पहिल्य दोन्ही सेटमध्ये चमकदार कामगिरी करूनही गतविजेत्या दक्षिण कोरियाला पराभूत करण्यात भारतीय महिलांना थोडक्‍यात अपयश आले. मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि सुरेखा वेण्णम यांच्या भारतीय महिला संघाने बलाढ्य कोरियाला तिसऱ्या सेटपर्यंत कडवी झुंज दिली. भारतीय महिलांनी पहिला सेट 59-57 असा जिंकला. त्यात पाच 10 पॉइंटरचा समावेश होता. दक्षिण कोरियाने दुसरा सेट 58-56 असा जिंकून 115-115 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटअखेरही 173-173 अशी बरोबरी जाल्यामुळे निर्णायक चौथ्या सेटबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु दक्षिण कोरियन महिलांनी सरस कामगिरी करताना हा सेट 58-55 असा जिंकून 231-228 अशा विजयासह सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. भारतीय महिलांनी गेल्या आशियाई स्पर्देत कांस्यपदक जिंकले होते. यंदा त्यांनी त्यापेक्षा सरस कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)