आवर्तनासाठी निरवांगीत शेतकरी एकवटले

ग्रामपंचायतीसमोर धरणे : अधिकाऱ्यांनीही हात झटकले

निमसाखर- निरवांगी (ता. इंदापूर) येथील परिसरातील शेताचा पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जलसंपदाचे अधिकारी पुन्हा टोलवाटोलवी करीत आहेत. यावेळी धरणामध्ये अल्प पाणीसाठा असल्याने 6 दिवसांत आवर्तन उरकण्याची सूचना आहे. उन्हाळी आवर्तनाचा निर्णय वरिष्ठांच्या दरबारात टोलावल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयालगत सोमवार (दि. 6) सकाळी 9 वाजता धरणे आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांचा भडिमार केला. मात्र, यात शेतकऱ्यांना शांत करीत तोडगा न काढता वरिष्ठांच्या कोर्टात निर्णय असल्याचे सांगून हात झटकले. त्यामुळे परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.

निरवांगी आणि दगडवाडी गावावर शेतीच्या पाण्यासाठी जलसंपदा अधिकाऱ्यांकडून नेहमीच अन्याय झाला आहे. यापूर्वी नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी झालेले आंदोलन हे ताजे उदाहरण आहे. पाटबंधारे खात्याअंतर्गत जलसंपदा विभागाच्या कालव्यावरील क्रमांक 57 व 54 फाट्यावरील दारे क्रमांक 9 वरील शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होत आहे. शेतकऱ्यांवर पाणीपट्टी भरूनही उन्हाळी आवर्तन मिळत नसेल तर आमच्यावर अन्यायच होतो का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. दारे क्रमांक 57 वर चाळीस एकर क्षेत्र अद्यापही आवर्तन मिळण्यापासून वंचित राहिले आहे. गेल्यावर्षी उन्हाळी आवर्तनावेळी ही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भरणी झाली नव्हती. यंदाही उन्हाळी आवर्तनात पिकांना आवर्तन मिळेल, अशी आशा होती. मात्र, संतप्त झालेले शेतकरी एकवटले. शेतकरी ग्रामपंचायत परिसरात जमा झाले. सकाळी नऊपासून निरवांगी येथील धरणे आंदोलन सुरू होते.

यावेळी जलसंपदाचे निमगाव शाखेचे लक्ष्मण सुदरीक उपस्थित होते. या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेले शेतकरी व ग्रामस्थांनी खात्याचे वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. त्यानंतर अधिकारी येणार असल्याची माहिती देत देत दुपारी साडेतीनला आले. यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. यावेळी काहीकाळ शेतकरी आक्रमक झाले. यामध्ये वालचंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोहन फाळके यांनी मध्यस्थी करीत ग्रामस्थांना शांत केले. यानंतर शेतकरी व अधिकारी यांच्या चर्चेनंतर 57 फाट्याचा निर्णय अखेर वरिष्ठांवर ढकलून रिकामे झाले. यामुळे निरवांगीकरांमधून संतापाची भावना परिसरातून आहे.

  • निरवांगी भागाला नीरा डाव्या कालव्याच्या 57 फाट्यावरील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवर्तन मिळविण्यासाठी निर्णय वरिष्ठांच्या हाती आहे. त्यामुळे वरिष्ठ जो आदेश देतील त्याप्रमाणे अंमलबजावणी करु. शेतकऱ्यांना आवश्‍यक ती सर्व मदत करणार आहे.
    -विजय नलवडे, सहायक अभियंता, जलसंपदा बारामती विभाग.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.