आळंदीसह सोळू-मरकळ येथे रुट मार्च

आळंदी- येत्या सोमवारी (दि. 29) शिरूर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवून जय्यत तयारी करण्यासाठी आज (शुक्रवारी, दि. 26) सकाळी आळंदी शहरातुन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला.

राज्य राखीव दलाचे सीआरपी/एसआरपी जवानांच्या मोठ्या ताफ्यासह सहा वरिष्ठ पोलीस अधिकारी, शंभर पोलीस जवान व कर्मचारी यांनी रुट मार्चमध्ये सहभाग घेतला. रुट मार्च हा आळंदी पोलीस ठाणे, माऊली मंदिर, चाकण चौक, प्रदक्षिणा मार्गाने सोळु, मरकळ, धानोरे आदी ठिकाणी घेण्यात आला. तत्पूर्वी शिरूर लोकसभा मतदानाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व जवानांची आळंदी देवाची पोलीस स्टेशनच्या भव्य मैदानात वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली सर्वांची प्रथम हजेरी घेण्यात आली. त्यांना दि. 29 रोजीच्या बंदोबस्ताविषयी सखोल अशी माहिती देण्यात आली. यावेळी प्रकाश जाधव, डी. एल. शिंदे, पाटील, शेंड्ये, महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी व आळंदी देवाची पोलीस ठाण्याचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

रवींद्र चौधर यांनी सांगितले की, लोकसभेची ही प्रतिष्ठेची लढाई असुन, मतदान काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांततेत मतदान पार पडावे ही जबाबदारी प्रथम पोलीस प्रशासनाची आहे. कोणतेही गालबोट लागता कामा नये ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी ही पोलीस प्रशासनाची नैतिक जबाबदारी असून, यासाठी बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांचे देखील सहकार्य अपेक्षित असल्याचे चौधर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.