आळंदीत आजपासून दिवसाआड पाणी

नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर : केवळ एक ते दीड तास होणार पुरवठा

आळंदी- शहरात बुधवार (दि. 10)पासून दिवसाआड विभागवार पाणीपुरवठा केला जाणार आहे. तर एका भागात केवळ एक ते दीड तास पाणी तब्बल 48 तासांच्या अंतराने पुरवले जाणार आहे. शहरातील नळजोडची संख्या वाढल्याने आणि जलशुद्धीकरणास वेळ लागत असल्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आणि पाणी पुरवठा विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्‍के यांनी दिली.

शहरात यापूर्वी तीन ते साडेतीन हजार नळजोड होते.आता यामध्ये दुपटीने वाढ झाल्याने अनेक भागात पाणीच पोहोचत नाही. शहराची क्षमता सात एमएलडीची आहे. तर 24 तासांत दहा एमएलडी पाणी शुद्धीकरण केले जाते. मात्र जलकुंभ भरण्यासाठी वेळ लागल्याने 7 एमएलडी पाणी पुरवले जाते. पाणीपुरवठा करण्यासाठी गावठाणात पाच आणि हवेलीसाठी पाच विभाग केले आहेत. शहरात हवेली हद्दीत देहूफाटा येथे दहा आणि पाच लाख लिटर क्षमतेच्या दोन जलकुंभ, तर गावठाणात प्रदक्षणा रस्त्यावर पाच आणि साडेचार लाख लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ आहेत. चऱ्होली रस्त्यावर साडेचार लाख, वडगाव रस्त्यावर तीन लाख, चाकण रस्त्यावर सहा लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ आहे.हे जलकुंभ भरण्यासाठी वेळ लागत असल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचण होते. याशिवाय नदीला असलेली जलपर्णी, पंपिंगसाठीचा वेळ, वॉशआऊट करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. यामुळे समान पाणी वाटप होत नाही.नागरिकांची अडचण होवू नये आणि पूर्ण क्षमतेने पाणी पुरवण्यासाठी दिवसा आडपाणी पुरवठ्याचा विचार पालिकेने केला असल्याने नगराध्यक्ष उमरगेकर आणि सोनटक्के यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.