आर्थिक बक्षीसाऐवजी गुरुकडे गाणे शिकण्याची संधी द्या

महेश काळे: सांस्कृतिक कट्टयावर दिलखुलास गप्पा
पुणे,दि.26 – मुलांना कमी वयातच रिऍलिटी शोमध्ये मिळालेले यश त्यांना पचवता आले पाहिजे. या ठिकाणी पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. या स्पर्धांमध्ये आर्थिक बक्षिसाऐवजी गाण्याची संधी किंवा मान्यवर गुरूंकडे शिकण्याची संधी मिळणे या मुलांसाठी अधिक योग्य ठरेल असे वाटते. रिऍलिटी शोमधील विजय हा मैलाचा दगड असावा, अंतिम ध्येय नसावे असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांनी व्यक्त केले.
महेश काळे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा या उपक्रमाअंतर्गत आज पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
काळे म्हणाले, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गायनाचे धडे गिरवत असताना मी सकाळी उठून त्यांच्याकडे जायचो, त्यांच्याकडून जे जे काही शिकता येईल ते ते शिकायचो. पुन्हा शाळा, कॉलेज करून संध्याकाळीही त्यांच्या घरी हजार असायचो. हा क्रम अगदी सुट्टीच्या शनिवार, रविवार या दिवशीही चुकवलेला नसायचा. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या होत असल्याचे काळे यांनी नमूद केले.
लहान मुलांमधील कलागुणांना जोपासण्यासाठी आजची आपली शिक्षण पद्धती योग्य आहे का, आणि तिचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल का असा प्रश्न विचारला असता महेश काळे म्हणाले की, आपली शिक्षणपद्धती ही मुलांमधील कलागुण जोपासण्यासाठी फारशी प्रोत्साहन देत नाही. संगीत, कला, प्रेम आणि सहअनुभूती ही मूल्ये प्राथमिक शिक्षणातूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबणे आज आवश्‍यक आहे, असे मला वाटते.
संगीताचा निर्व्याज आनंद व्यक्तींमध्ये आत्मभाव कसा निर्माण करतो हे सांगताना त्यांनी एक किस्सा सांगितला. ”12 ते 15 वर्षे संगीताचे शिक्षण घेतलेली पाकिस्तानी मुलगी अमेरिकेत माझ्याकडे शिकायला आली. आपल्याला संगीताचे पुरेसे ज्ञान आहे आणि केवळ ‘ऍडव्हान्स्ड’ ज्ञानाची आपल्याला गरज आहे असा तिचा समज होता. परंतु मी तिचे गाणे ऐकून तिला गाणं सुरूवातीपासून शिकण्याचा सल्ला दिला. ते तिला तितकेसे आवडले नाही. परंतु शिकायला सुरूवात केल्यानंतर तिच्या ठायी इतका आपलेपणा निर्माण झाला की एकदा तिने स्वतःहूनच गुरूसेवेच्या भावनेने माझ्या घरातील भांडी घासून ठेवली आणि माझ्या जेवणासाठी भाजीही करून ठेवली.”

गुगल हा गुरु होऊ शकत नाही..
हल्ली गूगलवर प्रत्येक घराण्याचे गाणे ऐकायला मिळत असले तरी गूगल हा गुरू होऊ शकत नाही, हा मुद्दाही काळे यांनी मांडला. काळे म्हणाले, आताच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मी कुठेही राहिलो तरी माझ्या शिष्यांच्या संपर्कात राहू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या चांगल्या गोष्टींचा फायदा जरूर घ्यावा. परंतु मूळ गाभा सोडता कामा नये. ज्ञानाची प्रत्यक्ष ऊब ही गुरूसमोर बसून शिकतानाच मिळते. आपल्या अनुभवातील प्रचितीचा पोत उंचावण्यासाठी गुरू आवश्‍यक असतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)