आर्थिक निकषावरील आरक्षणावर प्राथमिक स्तरावर चर्चा

मोदी सरकारकडून पर्यायांची चाचपणी
नवी दिल्ली – आरक्षण आंदोलनांनी राज्य आणि केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली असताना, आता मोदी सरकारने पर्यायांची चाचपणी सुरु केली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यापैकी आर्थिक निकषावर आरक्षण देता येईल का? या पर्यायावर केंद्रात खल सुरु असल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रात मराठा आंदोलन, गुजरातमध्ये पटेल, हरियाणात जाट, राजस्थानात गुर्जर अशी आंदोलने देशभरात पेटली. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सरकार आता आरक्षणाच्या पर्यायांवर चर्चा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व जातींमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण देण्याचा विचार सुरु आहे. सध्या केवळ प्राथमिक स्वरुपात हा पर्याय समोर आला आहे. यावर अजून चर्चेला सुरुवात मात्र झालेली नाही. मोदी सरकारकडून केवळ या पर्यायाची चाचपणी सुरु आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जर मोदी सरकारला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचे असेल, तर त्यासाठी घटनात्मक बदल करावा लागणार आहे. ते काम सोपे नाही. त्यासाठी दोन तृतीयांश खासदारांची संमती असणे गरजेचे आहे. मात्र ती संमती मिळणे सध्यातरी अवघड आहे.

दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये विविध जातींकडून आरक्षणासाठी जनआंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारसह अन्य राजकीय पक्षांकडून खोटी आश्‍वासने देण्यात येत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबतची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, कोणत्याही राज्यात 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आरक्षण देता येऊ शकत नाही. सद्याच्या आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी 15 टक्‍के, अनुसूचित जनजातीसाठी 7.5 टक्‍के आणि मागास वर्गासाठी 27 टक्‍के आरक्षण आहे.

महाराष्ट्र सदनात मराठा मोर्चा
राज्यातला मराठा आंदोलनाचा गजर आता राजधानी दिल्लीतही पाहोचला आहे. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाला समर्थन म्हणून राजधानी दिल्लीमध्येही मोर्चा काढण्यात आला.

सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र सदनामध्ये हा मोर्चा निघाला. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना समर्थन देण्यासाठी दिल्लीच्या कानाकोपऱ्यातले मराठा बांधव एकत्र झाले होते. आंदोलन हिंसेच्या नव्हे तर सामोपचाराच्या मार्गाने व्हावे, पण सरकारने आता आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार संभाजीराजेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)