आर्थिक गुन्हेगारांना हादरा देण्यासाठी… (भाग-२)

आर्थिक गुन्हेगारांना हादरा देण्यासाठी… (भाग-१)

भारत सरकारच्या कारवाईच्या धास्तीपोटीच मेहुल चोक्‍सीने अँटिग्वाचे नागरिकत्व घेत भारतीय पासपोर्ट जमा केला आहे. आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही, याची खात्री मेहुल चोक्‍सीला पटली आहे. आतापर्यंत अशा ठगांना भारतात आणणे म्हणजे महाकठीण बाब समजली जात होती. कॅरेबियन किंवा अन्य कोणताही लहान देश मोठी रक्कम घेऊन अशा प्रकारच्या फसवेगिरी करणाऱ्या नागरिकांना आश्रय देत आहे किंवा नागरिकत्व बहाल करत आहे; परंतु ब्रिटनसारखा देशही याच पावलावर पाऊल टाकत असल्याने आश्‍चर्य वाटू शकते. अनेकदा मानवाधिकारच्या नावाखाली संशयित आणि अन्य वादग्रस्त नागरिकांच्या प्रत्यार्पणाबत ब्रिटनने नकार दिला आहे. एखाद्या देशाला फसवणाऱ्या व्यक्तीला आपल्या देशात आश्रय देणे यासारखी वाईट गोष्ट दुसरी कोणतीही नसेल. जर भारतात विजय माल्ल्याला आणण्यास विलंब होत असेल तर त्याला ब्रिटन सरकार जबाबदार असेल. ब्रिटनमधील असे काही कायदे जबाबदार आहेत की ते मानवाधिकाराची काळजी घेतात. प्रत्यक्षात अशा गुन्हेगारांकडे मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून पाहणेच चुकीचे आहे. कॅसेटकिंग गुलशनकुमार यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य संशयित संगीतकार नदीम हा दोन दशकांपासून इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. यामुळे जगात चुकीचा संदेश जात नसेल का?

कोणत्याही दृष्टीने इंग्लंडची किंवा कॅरेबियन देशाची कृती ही समर्थनीय नाही. आर्थिक गुन्हेगारांना आश्रय देण्याचे धोरण हे उभय देशातील संबंधात ताण निर्माण करणारे आहेच त्याचबरोबर विश्‍वासर्हतेला देखील धक्का पोहोचवणारे आहे. भारत सरकारने अशा फरारी लोकांना चाप बसवण्यासाठी कायदा केला ते बरेच झाले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देखील गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या कायद्याविरुद्धही भारताने आवाज उठविला आहे. हे कायदे संशयितांचे संरक्षण करण्याचे काम करतात. हे कायदे मोडीत काढण्याला वेळ लागेल, मात्र जगासमोर ही गोष्ट सातत्याने मांडणे आवश्‍यक बनले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संघटना देखील भारताच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहात आहेत. यापूर्वी काळ्या पैशाने व्यवहार करणाऱ्या उद्योगपतीची यादी सादर करावी अशी मागणी भारताने केली होती. त्यावरही आंतरराष्ट्रीय संघटनेने प्रतिसाद दिला होता. काहीअंशी ही मागणी पूर्ण देखील झाली. मेहुल चोक्‍सी, जतिन मेहता, नीरव मोदी किंवा विजय माल्ल्या हे भारतात कधी येतील हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र त्यांना परदेशात चैन करता येणार नाही, असा बंदोबस्त करायला हवा. देश-विदेशातील त्यांची मालमत्ता जप्त करण्याबरोबरच भारतीय कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत कधीही पोहोचू शकतात, अशी भावनाही या ठगांच्या मनात निर्माण व्हायला हवी.

– अॅड. प्रदीप उमाप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)