आरोपींच्या शोधार्थ 15 हजार किमी प्रवास!

पेट्रोल पंपाची साडेसत्तावीस लाखांची रोकड चोरणारे गजाआड


आरोपीच्या एअर होस्टेस बहिणीसह पिता, भावाचा सहभाग उघड

पुणे – बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपाची 27 लाख 59 हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट- 3 ने अटक केली. त्यांच्या ताब्यातून 24 लाख 12 हजार 150 रुपयांची रोकड, एक कार आणि चार दुचाकी असा 29 लाख 68 हजार 650 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यातील मुख्य आरोपीची एअर होस्टेस असलेली बहिणी आणि इतर कुटूंबाचा गुन्ह्यातील सहभागही उघडकीस आला आहे. आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांना तब्बल 15 हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला.

आहद अन्वर सय्यद (22, रा.संतोषनगर, कात्रज), साकीब मेहबुब चौधरी उर्फ लतिफ बागवान ( 20, रा. संतोषनगर, कात्रज) , तौसिफ उर्फ मोसीन जमिर सय्यद (23, रा.जामा मशीदसमोर, कात्रज), सूरज उर्फ मोटा उर्फ दस्तगीर शमशुद्दीन यालगी (19,रा.कोंढवा रोड,कात्रज) व जमिर अहमद हुसेन सय्यद (59,रा.खाजा बंदेनवाब दर्गाह, गुलबर्गा-कर्नाटक) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई, गुलमर्ग असा प्रवास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार, चार वेगवेगळ्या दुचाकी, मोबाइल हॅन्डसेट आणि पालघन असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकुर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र बाबर, पोलीस कर्मचारी संदीप राठोड, अतुल साठे, अनिल घाडगे, अशोक भोसले, गुणशिंलन रंगम, रोहीदास लवांडे, राजु रासगे, महेंद्र पवार, गजानन गणबोटे, अनिल भोसले, अशोक भोसले, शिवानंद स्वामी, आजिनाथ काळे, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे, सुजित पवार, संदेश निकाळजे, नागेश माळी, निलेश देसाई यांच्या पथकाने केली.

प्रकरण काय?
पुणे-सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी मटन शॉप चौकातील पेट्रोल पंपाची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना 24 मार्च 2018 रोजी बिबवेवाडी-कोंढवा रोडवर लुटण्यात आले होते. त्यांच्या वॅगन-आर कारला दुचाकी आडवी लावत कोयत्याचा धाक दाखवत 27 लाख 59 हजारांची रोकड असलेली बॅग हिसकावली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात बर्नाटदास अँथोनी (54, रा. रामवाडी) यांनी फिर्याद दिली होती. आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. दरम्यान, गुन्ह्याचा तपास मार्केटयार्ड पोलीस आणि युनिट- 3 चे पथकही करत होते.

अशी केली कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे यांच्यासह पथकाने जास्तीत जास्त सीसीटीव्ही फुटेज मिळवले होते. त्यानुसार दोन आरोपी हाती लागले. त्यांची कसून चौकशी केल्यावर तौसिफ उर्फ मोमीन जमीर सय्यद हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तपास करता तौसिफने बंगलोर येथे त्याची एअर होस्टेज असलेल्या बहिणीकडे लुटलेली काही रोकड दिल्याचे कळाले. तर उर्वरीत रक्कम वडिल जमीर सैय्यद यांच्याकडे दिली होती. त्याने रोकड लुटल्याची सर्व माहिती त्याच्या कुटूंबाला होती. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याचे कुटूंब मोबाइल नंबर व राहण्याची ठिकाणे वारंवार बदलत होते.

यामुळे त्यांचा माग काढणे पोलिसांना अवघड जात होते. तौसिफचा भाऊ तन्वीर जमीर सय्यद याने गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी तौसिफला गाडी पुरवण्याचे नियोजन केले होते. तौसिफला अटक केल्याचे समजताच त्याचे वडिल जमीर कर्नाटकात ठिकाणी लपले होते.

दरम्यान, ते चेन्नई येथील दर्गाह येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी ऊरुस असल्याने गर्दी होती. मात्र, याही परिस्थितीत पोलिसांनी त्यांना खबरदारी घेत अटक केली. त्यांनी चोरीतील 18 लाख 74 हजार रुपयांची रक्कम पोलिसांना काढून दिली. तौसिफचे वडिल जमीर यांचे तीन विवाह झाले आहेत. त्यांना एकूण सहा मुले आहेत.

रोकडचोरीचे यापूर्वीही प्रयत्न
यातील सुरज उर्फ मोटा हा पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता त्याला सोमवारच्या दिवशी पेट्रोल पंपावर जास्त प्रमाणात रोकड जमा होऊन बॅंकेत भरण्यासाठी जात असल्याचे दिसले होते. त्यानुसार त्याने तौसिफ बरोबर कट रचून सीमकार्ड, मोबाइल, दुचाकी आणि अंग पूर्ण झाकेल असे कपडे खरेदी केले होते. गुन्हा करण्याआधी दोन ते तीन सोमवार त्याने पेट्रोल पंपाची रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात त्यांना अपयश आले होते. सूरज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन तर तौसिफवर पाच गुन्हे दाखल आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)