आरोग्य कर्मचाऱ्यांची निवासस्थाने धूळखात

परिंचे – येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने धूळखात पडली आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कार्यक्षेत्रात राहणे बंधनकारक असताना एकही कर्मचारी कार्यक्षेत्रात राहत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सरकारने केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.

पुरंदरच्या दक्षिणेला तीस हजार लोकसंख्येसाठी परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. परिंचे परिसराबरोबरच काळदरी, बहिरवाडी सारख्या दुर्गम भागाचा समावेश या आरोग्य केंद्राच्या कक्षेत येतो. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बारा ठिकाणी उपकेंद्र आहेत. या केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर, चालक आदी अनेक कर्मचारी काम करीत आहेत.

परिसरातील नागरिकांना चोवीस तास आरोग्य व अत्यावक्षक सेवा मिळण्याच्या उद्देशाने शासनाने लाखो रुपये खर्च करून कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने उभारले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह, दोन आरोग्य सेविका व चालकाला राहण्याची व्यवस्था केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही आरोग्य कर्मचाऱ्यांची शासकीय निवासस्थाने बंद अवस्थेत आहेत. परिसरातील अनेक आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली असता अनेक उपकेंद्राच्या ठिकाणी आरोग्य सेविका रहिवासी नसल्याचे आढळून आले आहे.

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव याच गावातील असून येथील आरोग्य सेवेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्यामुळे या प्रश्‍नावर काय तोडगा काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत तीन वेळा ठोकले होते टाळे
या आरोग्य केंद्रातील एकही कर्मचारी अथवा अधिकारी परिंचे येथील मुख्यालयात राहत नाही. या केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी असून आळीपाळीने अधिकारी उपस्थित राहतात. रात्रपाळीसाठी आरोग्य सेविका किंवा परिचर उपस्थित असतात. मांढर, काळदरी, बहिरवाडी सारख्या दुर्गम भागात सर्पदंश, प्रसुती, तसेच शेतकऱ्यांचे अपघात घडतात.रुग्णाला तातडीने आरोग्य केंद्रात आणल्यावर वैद्यकीय अधिकारी नसतात. नाइलाजाने रुग्णाला खासगी रुग्णालयात किंवा तालुक्‍याच्या ठिकाणी हलवावे लागते. वैद्यकीय अधिकारी उपस्थित न राहण्याच्या कारणावरून या आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी तीन वेळा टाळे ठोकले होते. अनेक रुग्णांना अत्यावश्‍यक सेवा मिळाली नसल्याने आपले प्राण गमवावे लागले होते.

तीस हजार लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती होते. परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रावर अधिक भार असून साठ हजार लोकसंख्या असलेले क्षेत्रांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. काळदरी व गराडे या गावांना प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी मिळाली असून या ठिकाणी आरोग्य केंद्राची उभारणी झाल्यास परिंचे आरोग्य केंद्रावरील भार कमी होईल. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पाच गावांतील आरोग्य केंद्र बंद अवस्थेत आहेत. अनेक वर्षांपासून निवासस्थाने बंद अवस्थेत असून दुरवस्था झाली आहे.
– डॉ. हर्षल निताणेकर, वैद्यकीय अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.