आरक्षणाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका

माळेगावात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची टीका

माळेगाव- मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकील नागपूरचे आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्याचे ऍडव्होकेट जनरल नेमले होते. त्यांनी नंतर राजीनामा दिला. काळा कोट घालून नंतर ते न्यायालयात आरक्षणासंबधी वकीली करू लागले. वकीली करण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण, मुख्यमंत्र्याच्या जवळचे लोक आरक्षणाविरोधात याचिका दाखल करतात ही फसवाफसवी नाही का? आम्ही निर्णय देतो, असे सांगायचे. तरुणांची आशा वाढवायच्या आणि दुसऱ्या बाजूने निर्णय कसा अडकून राहील याबाबत काळजी घ्यायची, अशी दुटप्पी भूमिका घेणारे हे सरकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेचे पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.

बारामतीत गोंविंदबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले की, धनगर, मराठा, मुस्लीम समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतो असे म्हणून भाजप सरकारने सर्वांनाच झुलवत ठेवले आहे. याबाबतचे घेतलेले कोणतेच निर्णय न्यायालयात टिकणार नाहीत, अशी भूमिका घ्यायची, असे दुटप्पी धोरण भाजप सरकारने अवलंबले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याविषयी बोलताना पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने पाकिस्तानला लक्ष्य करुन लोकांची भावना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचवेळी ते नियोजित दौरा नसताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेतात. आताच्या पंतप्रधानांशी त्यांचे काय संबंध आहेत, माहित नाही. मात्र, टोकाची भुमिका घेऊन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. राज्यात बेरोजगारी, महागाई, दुष्काळ गंभीर आहे. पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही. मात्र, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सारेच जण या महत्वाच्या प्रश्नाला बगल देऊन जवानांच्या शौर्याचा उपयोग सत्ता मिळविण्यासाठी करीत आहेत. त्यांच्याकडे आता विकासाचे म्हणून सांगण्यासारखे काहीच नाही. मागील निवडणुकीत अच्छे दिनचे आश्वासन देणारे पंतप्रधान आता राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करीत आहेत. राष्ट्रवादाचे प्रश्‍न काढून मूळ विषयाला विचलित करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांपासून त्यांचे सारे सहकारी करीत आहेत, हे निषेधार्ह आहे.

  • …म्हणून बारामतीत सर्वांच्या सभा
    बारामतीत मुख्यमंत्री येऊन गेले. आता, अमित शहा येणार आहेत. नितीन गडकरी, स्मृती इराणी सभा घेणार आहेत, असे ऐकायला मिळते. पण, मी काही जणांशी बोललो, तेव्हा त्यांच्या सांगण्यानुसार आमच्यावर भाजपवाल्यांनी भाषणांतून कितीही मारा केला तरी काही वाटत नाही. आता, आम्हीच त्यांच्यापेक्षा जास्त मारा करू, अशी लोकांत चर्चा आहे. बारामतीत त्यांना काही करता येत नाही. त्यामुळेच भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत केले असून सर्वजण सभा घेत आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.