आय एम कलाम -एका स्वप्नाचा प्रवास( भाग ३)

आय एम कलाम -एका स्वप्नाचा प्रवास( भाग २ )

अश्‍विनी धायगुडे-कोळेकर
चित्रपट हे नेहमीच ठराविक प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवून बनवले जातात. विशेषतः तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून सिनेमांची निर्मिती केली जाते असं म्हणणं तितकसं वावगं ठरणार नाही. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेले बालचित्रपट तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यातही मुलांचे भावविश्‍व जपणारे सिनेमे तर फारच कमी. या सगळ्यामागं बॉक्‍स ऑफिसवर कमाई हा विषय तर आहे; पण त्याहूनही असे चित्रपट बनवण्यासाठी लागणारी प्रगल्भ मानसिकतेची वानवा.

एका प्रसंगांमध्ये छोटू ऊर्फ कलामवर रणाविजयचे बाबा आणि इतर लोक चोरीचा आळ घेतात. भाटी मामा आणि छोटूची आईदेखील तिथे येते; पण जेव्हा त्याची आई त्याला या चोरीचा जाब विचारते, तेव्हा छोटू कोलमडून पडतो. कारण आईच्या डोळ्यातील अविश्‍वास त्याला जास्त त्रासदायक ठरतो. तिथून निघून जाण्यासाठी बाहेर पडतो. भाटीच्या हॉटेलमधून बाहेर पडणारा छोटू खाली पडतो. पुन्हा उठतो आणि ट्रकमध्ये बसून दिल्लीला डॉ. कलाम यांना भेटायला जातो. या सिनेमामधली ही फ्रेम म्हणजे सिनेमाचा “पिक पॉईंट’ असं म्हणावं लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या आयुष्यातही अनेक अडथळे येतात, ज्यामुळं आपण धडपडतो. आपल्याला लागतं; पण तरीही पुन्हा उठून चालण्याची जिद्द जो माणूस ठेवतो, तोच आपल्या निश्‍चित ध्येयापर्यंत पोचतो. हेच या फ्रेममधून अधोरेखित होतं. सोबतच छोटू जेव्हा दिल्लीला निघून जातो आणि रणविजय त्याच्या शोधासाठी भाटीच्या हॉटेलवर येऊन त्याची विचारपूस करतो. लपटन त्याला म्हणतो, की मी सांगतो तुम्हाला छोटूबद्दल तेव्हा त्याला मध्येच तोडून रणविजय म्हणतो, “छोटू नही कलाम इथंच खऱ्या अर्थानं छोटूचा कलाम होण्यासाठीचा प्रवास सुरू झाला आहे.’

या सिनेमामध्ये असणारी सगळी पात्रं ही जिवंत वाटतात. हर्षनं उभा केलेला छोटू तर अफलातून आहे. त्याचे डोळेच प्रचंड बोलके आहेत. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी यांच्याही वाट्याला आहेत; पण तरीही या माणसांमधला चांगुलपणा संपलेला नाही. छोटूची आई, भाटी मामा, रणविजय, त्याची आई व बाबा, भाटीची मैत्रीण, तो ट्रकवाला, छोटू दिल्लीमध्ये गेल्यावर संसद भवनाच्या परिसरातील तो गार्ड आणि अख्ख्या सिनेमामधला “ग्रे शेड’ असणारा लपटनसुद्धा. इथं प्रत्येकामध्ये छान, चांगलं काहीतरी आहे ते आपण शोधलं की आपल्याला चांगलं आणि सकारात्मकच दिसतं. तुमच्या ध्येयाप्रती असणारी तुमची भावना स्वच्छ आणि निर्मल असेल, तर सगळं जग तुमच्या मदतीसाठी उभं राहतं. हा साधा सरळ संदेश ही इथं दिग्दर्शक देऊन जातो.

हा चित्रपट फक्त गरीब मुलाची कथा नाही, तर त्याच्या स्वप्नांप्रती असणारी त्याची भावना किती अस्सल आहे, याचं उदाहरण आहे. सोबतच नशीब तुम्हाला नाही, तर तुम्हीच नशिबाला घडवायचं असतं, हा साधा संदेश अप्रतिमरित्या दिग्दर्शकानं दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)