आयकरावरील व्याज आकारणी

सीए चंद्रशेखर चितळे

आयकर कायद्यामधील तरतुदीनुसार करदात्यावर विविध स्वरूपामध्ये आणि विविध वेळांवर आयकर भरण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. काही प्रसंगी करदात्यांकडून अनावधानाने आयकर वेळेवर भरला जात नाही. कधी करदात्याकडे पैशाची कडकी असल्यास किंवा अन्य कारणांनी आयकराचा भरणा करण्यास उशीर होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयकर मुदतीमध्ये भरला न गेल्यास सरकारला पैसे वेळेवर मिळत नाहीत आणि वापरता येत नाहीत. म्हणजेच, एका दृष्टिकोनामधून पाहिल्यास सरकारचे पैसे करदाता वापरत असतो. या समस्येवर एक उपाय म्हणून आयकर कायद्यामध्ये आयकर मुदतीमध्ये न भरल्यास, अशा रकमेवर “व्याज’ आकारण्याची तरतूद आहे. अशी व्याज आकारणी ही सक्तीची आहे. करदात्याकडून ते करासारखेच वसूल करण्याचा अधिकार आयकर अधिकाऱ्यास आहे.

आयकर कधी भरावा? व्याज किती?

आगाऊ कर : चालू आर्थिक वर्षामध्ये कमविलेल्या करपात्र उत्पन्नावर त्यापुढील आर्थिक वर्षामध्ये आयकर भरावा लागतो; परंतु आर्थिक वर्ष सुरू असतानाच त्यावर्षी किती करपात्र उत्पन्न होईल याचा अंदाज घेऊन चार तिमाही हप्त्यांमध्ये विभागून एकंदर कराची रक्कम अगाऊ कर म्हणून भरावी लागते. हप्ते पुढील प्रमाणे आहेत. 1) 15 जुन-30 टक्‍के 2) 15 सप्टेंबर, 3) 15 डिसेंबर 75 टक्‍के आणि 4) 15 मार्च 100 टक्‍के (टक्‍केवारी ही एकंदर देय आयकराची आहे.) प्रत्येक हप्त्यामध्ये ठरवून दिलेल्या टक्‍केवारीपेक्षा कमी अगाऊ कर भरल्यास कमी भरलेल्या पहिल्या तीन हप्त्यांसाठी 3 टक्‍के दराने आणि शेवटच्या हप्त्यासाठी 9 टक्‍के दराने व्याज भरावे लागते. एकंदर भरलेला आगाऊ कर एकंदर करपात्र उत्पन्नावरील आयकरापेक्षा कमी असल्यास त्यामध्ये काही प्रमाणात सवलत मिळते) आर्थिक वर्ष संपल्यानंतर येणाऱ्या 1 एप्रिलपासून फरकाची रक्कम भरण्याच्या दिवसापर्यंत दरमहा 9 टक्‍के या दराने व्याज लागू होते.

स्वयंनिर्धारण कर : आयकराचे विवरणपत्रक भरण्यापूर्वी एकंदर उत्पन्नाचे विवरण आणि देय आयकराचे मोजमाप केले जाते. भरलेला अगाऊ आणि अन्य कर, झालेली करकपात या एकंदर रकमेपेक्षा एकंदर देय कराची रक्‍कम अधिक असल्यास कमी भरल्या गेलेल्या आयकराची रक्कम विवरणपत्रक भरण्यापूर्वी आयकर खात्याकडे जमा करणे आवश्‍यक आहे. उदा. देय कर रुपये 10 लाख, आगाऊ कर रुपये 7 लाख आणि करकपात रुपये 1 लाख असल्यास रुपये 2 लाख एवढा स्वयंनिर्धारण कर भरावा लागेल. स्वयंनिर्धारण कर भरण्यास उशीर झाला तर आयकराचे विवरणपत्रक भरण्याच्या मुदतीपासून ते असा कर प्रत्यक्ष भरण्याच्या दिवसापर्यंत दर महा 1 टक्‍के दराने व्याज भरावे लागते.

निर्धारणा कर : आयकर अधिकारी उत्पन्नाची छाननी करून एकंदर करपात्र उत्पन्न आणि आयकराची रक्कम ठरवतो. या कराच्या रकमेमधून करदात्याने भरलेला एकंदर आयकर वजा जाता बाकी उरलेली रक्कम म्हणजे निर्धारणा कर. तो 30 दिवसात भरावा. निर्धारणा कर भरण्यामध्ये दिरंगाई झाल्यास कर निर्धारणा केल्यापासून 30 दिवसानंतर भरल्यास आशा कराच्या रकमेवर 30 दिवसानंतर कर भरेपर्यंत कालावधीसाठी दर महा 9% दराने व्याज भरावे लागते.

कर कपात : करदात्यास दुसऱ्या व्यक्तीस देण्यात येणाऱ्या उत्पन्नामधून ते आदा करण्यापूर्वी अगर त्यारकमेची हिशेबामध्ये नोंद करताना जी घटना आधी घडेल त्यावेळी आयकर कपात करणे सक्तीचे आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये केलेली करकपात महिना संपल्यानंतर 7 दिवसांचे आत आणि मार्च महिन्यामध्ये केलेली करकपात 31 मेपर्यंत भरावी लागते. करकपातीची रक्‍कम मुदतीमध्ये न भरल्यास त्यावर व्याज भरावे लागते. करकपात करून ती रक्कम वेळेवर न भरल्यास दरमहा 1.5 टक्‍के या दराने तर कर कपात न केल्यास आणि त्यामुळे न भरल्यास दरमहा 1% या दराने व्याज आकारणी केली जाते.

व्याजाचा कालावधी

व्याज हे दरमहा असले तरी अपूर्ण महिना हा एक संपूर्ण महिना धरला जातो. उदा. तीन महिने आणि तीन दिवस उशीर झाला तर चार महिन्याचे व्याज आकारले जाते. कालावधी संबंधी हा नियम सर्वांनी लक्षात घ्यावा.

व्याजाची वजावट

सामान्यत: भरलेल्या व्याजाच्या रकमेची करपात्र उत्पन्नामधून व्यावसायिक अगर घरासाठीचे अगर अन्य उत्पन्न वजावट मिळते; परंतु वर वर्णन केलेल्या आयकरावरील व्याजाची करपात्र उत्पन्नामधून वजावट मिळत नाही. त्यामुळे या व्याजाचा प्रत्यक्ष फटका अधिक बसतो.

आयकर विभागाकडून व्याज

देय करापेक्षा भरलेला अगाऊ कर आणि झालेली कर कपातीची रक्कम अधिक असल्यास करदात्याला आयकराचा परतावा मिळतो. अशा परताव्याच्या रकमेवर देखील करदात्यास व्याज दिले जाते. असे व्याज आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या 1 एप्रिलपासून ते कराचा परतावा आदा करण्याच्या दिवसापर्यंत दिले जाते; परंतु त्याचा दर दरमहा अर्धा टक्‍के आहे आणि हे व्याज करपात्र आहे. हे व्याज न दिल्यास करदात्याने आयकर अधिकाऱ्याकडे त्याची मागणी करावी. असा आहे आयकर कायद्यामधील व्याजाचा प्रपंच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)