आम्ही मार खायला येतो का?

पिंपरी- आम्ही काय महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांचा मार खायला येतो का? लोकांनी आम्हाला मार खायला महापालिकेत पाठवले नाही, असा संताप भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला. महापालिकेतील अधिकाऱ्याने शिवसेना गटनेता राहुल कलाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकारणाचे महापालिका सभागृहात पडसाद उमटले.

महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि.22) पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. नगरसेवक कलाटे यांच्या धमकीचा निषेध करण्यासाठी कर्मचारी महासंघाच्या बैठकीत एका अधिकाऱ्याने “नगरसेवकांना चोपून काढा’ असे चिथावणीखोर वक्‍तव्य केले होते. त्याचा वीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या वादग्रस्त विषयावर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी चर्चेला सुरूवात केली. महापालिका कर्मचारी नगरसेवकांना मारण्याची भाषा करत असतील तर, आम्हाला महापालिकेत दररोज “सेफ्टीगार्ड’ घालूनच यावे लागेल. महापालिका आयुक्‍तांनी हा विषय गांभिर्याने घ्यावा, अशी मागणी केली.

भाऊसाहेब भोईर यांनी या विषयावर तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या. या महापालिका कर्मचाऱ्याला एवढी कसली मस्ती चढली आहे. अधिकारी, कर्मचारी महापालिकेचे सेवक आहेत. काम करून ते काही महापालिकेवर उपकार करत नाहीत. त्याचाच ते पगार घेतात. लोकप्रतिनिधींचा आदर ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नीटच वागायचे, अशा शब्दांत त्यांनी त्रागा व्यक्‍त केला.
या विषयावर सचिन चिखले, एकनाथ पवार, बाळासाहेब ओव्हाळ, शत्रुघ्न काटे, अजित गव्हाणे यांनी तीव्र शब्दांत भावना व्यक्‍त केला.

“त्या’ कर्मचाऱ्याला “समज’ द्या : महापौर
नगरसेवकांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्‍त केल्यानंतर सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मीदेखील एक कामगार नेता असल्याचे सांगत या कर्मचाऱ्याला एक संधी देण्याची मागणी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपली पात्रता न सोडता जबाबदारीने वागावे. शहराचा विकास करण्याची भूमिका बजावावी, असे सांगत महापौर राहुल जाधव यांनी संबंधित कर्मचाऱ्याला योग्य ती समज देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

नगरसेवकांनी मांडलेल्या प्रातिनिधिक भावना
– “त्या’ कर्मचाऱ्याला निलंबित करा.
– कर्मचाऱ्याने सभागृहाची बिनशर्त माफी मागावी.
– आयुक्‍तांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल कसा केला ?
– आयुक्‍तांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही.
– महापालिका प्रायव्हेट लिमिटेड फर्म झाली आहे.
– ध्यानधारणेसाठी अधिकाऱ्यांना विपश्‍यनेला पाठवा.
– घडलेल्या प्रकाराची शहानिशा करावी.
– वेळेत काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा.
– कर्मचाऱ्यांचे राजकीय लागेबांधे असल्यानेच असे वक्‍तव्य
– “त्या’ कर्मचाऱ्याला कठोर शब्दांत समज द्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)