आम्ही अनुभवलेले अद्‌भूत श्रीनगर

वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेने श्रीनगरसारख्या एका दुर्गम व अशांत परिसरात जाऊन यज्ञाचे आयोजन केले होते. देशाच्या सीमेवर नैसर्गिक आपत्तीचा सामना करत देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल आदर आपल्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये आहे.

जवानांच्याबद्दल आदर असल्यामुळे कोणी राखी पाठवितात, कोणी पत्र पाठवितात, कोणी जवानांच्या कुटुंबीयांशी संबंध ठेवून त्यांना पाठिंबा देत असतात. यज्ञाचा संकल्पदेखील अखंड भारताच्या अंतर्गत असलेल्या जम्मू-काश्‍मिर प्रांतात राष्ट्रविरोधी, एकमेकांबद्दल असलेला द्वेष, यातून निर्माण होणाऱ्या वाईट आचरणांचा परिहार व्हावा, सगळ्यांचे आत्मबल, धर्माचा अभ्युदय, बंधुभाव वाढावा, देशकल्याण व्हावे यासाठी होता. देशाच्या हितासाठी व श्रीनगरच्या जनतेसाठी ही वेदमंत्रांची प्रार्थना आम्ही आजपासून करत आहोत असा संकल्पपूर्वक वेदप्रार्थना व वेदमंत्रांनी आहुती असा कार्यक्रम होता.

कांची कामकोटीपीठाचे जगद्‌गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी दिलेल्या प्रेरणेतून वेदमहर्षी कै. विनायकभट्ट घैसास गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीनगरमधील पुरातन ज्येष्ठामाता मंदिराच्या शांत, पवित्र व नयनरम्य परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आम्ही सर्वजण मनोमन प्रार्थना करून वेदभवनातून पहाटे तीन वाजता निघालो. पुणे ते श्रीनगर असे विमान होते.आमच्याबरोबर पुणे, त्र्यंबकेश्‍वर, बार्शी, गोवा आणि गया येथील वेदप्रेमी मंडळी होती.

श्रीनगरमध्ये प्रवेश केल्यानंतर मोरेश्‍वर घैसास गुरुजींचे कार्यक्रमाचे नियोजन व श्रीनगरमध्ये कायम राहत असल्यासारखे हिंडणे पाहता आश्‍चर्यचकित झालो. ते स्वतः व त्यांचे काही सहकारी अगोदरच श्रीनगरमध्ये दाखल झाले होते.त्यांनी तेथील सर्व प्रवाशांच्या व्यवस्थेसाठी नाझिर नावाच्या एका व्यक्तीची नेमणूक केली होती. आम्ही विमानतळावरून श्रीनगर शहरातून जात होतो, तेव्हा आपण ज्या शहराविषयी ऐकतो आहोत, तेच हे शहर का? असा मनामध्ये प्रश्‍न उपस्थित झाला.

आम्ही सर्वजण जेव्हा प्रत्यक्ष ज्येष्ठामाता मंदिरात पोहोचलो तेव्हा मात्र पुण्यातील एक वैदिक हजारो मैल दूर येऊन एका पवित्र स्थलाचा शोध घेऊन अशा प्रकारचे कार्य करू शकतो, यालाच आपल्याकडे योजकस्तत्र दुर्लभःम्हणतात.

आम्ही रोज दुपारी 1 ते 6 या वेळात श्रीनगरमधील विविध स्थळांना भेट देण्यासाठी जात होतो, यामध्ये क्षीरभवानी मंदिर, सूर्यमंदिर, रणवीर महेश मंदिर, गुप्तगंगा, चक्रेश्‍वर मंदिर, हरीप्रिया पर्वत, पेहलगाम मधील आमलेश्‍वर मंदिर, त्याचबरोबर मुघल गार्डन, निशाद गार्डन, ट्युलिप गार्डन हे सुद्धा पाहण्याचा योग आला.

श्रीनगरमधील मंदिरांचा इतिहास हा 300 ते 1000 वर्षे जुना असून ही मंदिरे आजसुद्धा सुस्थितीत आहेत. तेथील पूजाअर्चा सुरू आहे. या सर्व मंदिरांसाठी वेगवेगळी सुरक्षा योजना आहे. श्रीनगरमधील शंकराचार्य टेकडी या डोंगराच्या टोकावर महादेवाचे मंदिर असून या मंदिराची निर्मिती ही अंदाजे 4000 वर्षांपूर्वीची असावी. तेथेच श्रीमद जगदगुरू शंकराचार्य यांच्या वास्तव्याने पुनित झालेली गुंफा आहे

खीरभवानीमाता मंदिराची एक आख्यायिका आहे. लंकेतून रावणवधानंतर हनुमंताला आदेश देऊन माता पार्वती ही तळ्यामध्ये राहिली. या तळ्याचा रंग कधी लाल, कधी निळा, तर कधी हिरवा असतो.

सूर्यमंदिर, रणवीर महेश मंदिर (250 वर्षापूर्वी याचे बांधकाम राजा गुलाबसिंग याने केले.पार्वतीमातेला तहान लागली व भगवान शंकरांनी या ठिकाणी योगशक्तीने गंगेला आवाहन करून या कुंडामध्ये तिची स्थापना केली.) जगदंबा शरीका मंदिरात अंबा शरीकेची 12 उंचीची स्वयंभू मूर्ती आहे. हे 1000 फूट उंचीवर आहे.या मंदिरातूनही श्रीनगरचे मनोहारे दर्शन घडते.

पहेलगाममध्ये नयनरम्य व्हॅलीमधून चारही दिशांना बर्फाच्छादीत शिखरे दिसतात. यामध्ये सुमारे 1150 साली जयसीकबा राजाने बांधलेले, दगडांची रचना असलेले भव्य मंदिर असून त्यावर सोनेरी कळस आहे. मंदिराच्या पुढे शुद्ध स्फटिकासारखे पाणी असणारे कुंड आहे. अशा अनेक मंदिरांना आम्ही भेटी दिल्या.

श्रीनगरच्या उत्पत्तीची पुराणात एक आख्यायिका आहे, या ठिकाणी सती सरोवर नावाचे मोठे सरोवर होते. सती पार्वती येथे नौका विहार करीत असत म्हणून या सरोवराला सती सरोवर असे नाव होते. या सरोवरात जलोदभव नावाचा राक्षस राहत होता, तो पार्वतीच्या नावेला त्रास द्यायचा तसेच आसपासच्या नागलोकांना त्रास देत असे, ही माहिती कश्‍यप ऋषींना समजली म्हणून त्यांनी वराहमुल्ला (सध्याचे बारामुल्ला) या ठिकाणी असलेल्या पर्वतांची रांग फोडून सरोवरातील पाणी बाहेर सोडून दिले. त्यामुळे हा जलोदभव नावाचा राक्षस मारला गेला. कश्‍यप ऋषींनी सरोवर आटवून निर्माण केलेली जागा म्हणून या भूमीस कश्‍यपमीर असे नाव मिळाले व पुढे काश्‍मीर हे नाव रूढ झाले.

अशा या आपल्या भारताच्या ऐतिहासिक अविभाज्य भाग असलेल्या श्रीनगरला आपण सर्वांनी जायला हवे. तेथे असलेल्या आपल्या जुन्या हिंदू संस्कृती दर्शविणारी मंदिरे यांना आपण नक्की भेट द्यावी व आपली संस्कृती पुढील पिढीस सांगून या देवनिर्मित भुलोकीच्या स्वर्गास भेट उद्युक्त करावे.

सुभाष दांडेकर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)