आमदार जगताप, लांडगे राजीनामा द्या!

– मारुती भापकर : दोन्ही खासदारांनाही केले आवाहन
– मराठा आरक्षणाचा मुद्दा : लोकप्रतिनिधींच्या निर्णयाकडे लक्ष

पिंपरी – सकल मराठा समाजाच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी स्वत:हून राजीनामे द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकल मराठा समाजाच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी मराठा मूक क्रांती मोर्चाच्या वतीने “मराठा आरक्षण’ या मुख्य मागणीसह विविध मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्यात अतिशय शिस्तबद्ध व सनदशीर मार्गाने लाखो नागरिकांचे तब्बल 58 मोर्चे काढण्यात आले. परंतु, महाराष्ट्र सरकारने वेळकाढूपणाची भूमिका घेऊन न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे प्रकरण अडकवले आहे. त्यामुळे शांत व संयमी असणारा मराठा समाज आक्रमक झाल्याने मूक मोर्चाचे रुपांतर “ठोक मोर्चा’त झाले आहे.

या मराठा आंदोलनातील औरंगाबाद येथील कार्यकर्ते काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत जलसमाधीचा इशारा देऊन आंदोलन केले. या आंदोलनाबाबत सरकारी यंत्रणेने अक्षम्य असे दुर्लक्ष केल्यामुळे काकासाहेब शिंदे या तरुण कार्यकर्त्याचा बळी गेला. ते समाजाच्या हितासाठी शहीद झाले. तसेच याच आंदोलनाचे एक कार्यकर्ते जगन्नाथ सोनवणे यांनी ही विष प्राशन करून आपल्या प्राणांची आहूती दिली. त्यानंतर सकल मराठा समाज आक्रमक होऊन संपूर्ण महाराष्ट्रात आगडोंब उसळला यासंदर्भात समाजमन अत्यंत संवेदनशील झालेले आहे.

याची दखल घेऊन कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर, शिवसेनेचे हेमंत पाटील, राहुल मोटे व कोंग्रेसचे भारत भालके यांनी समाजासाठी पुढे येऊन स्वत:च्या आमदारकीचे राजीनामे दिले आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी स्वत:हून राजीनामे द्यावेत, असेही भापकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
मराठा मोर्चातील मृत्यूमुखी पडलेल्या काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनवणे व पोलीस हवालदार शाम काटगावकर यांच्या कुटुंबियास प्रत्येकी 50 लाख रुपये त्वरीत मदत द्यावी. तसेच, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्‍तीस सरकारी नोकरी त्वरित द्यावी. तसेच मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी धनाजी पाटील, वैभव जाधव, अमोल मानकर, प्रवीण बोऱ्हाडे, भैय्यासाहेब गजधने, ज्ञानदेव लोभे, राजू पवार, राजेंद्र देवकर, अंतिम जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)