आमदार जगताप को गुस्सा क्‍यों आता है?

– खासदार बारणेंचा पलटवार : थेरगावविषयी त्यांना कायमच आकस!

पिंपरी – “आम्ही सगळे भाऊ सारे मिळून खाऊ’ असा कारभार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरु आहे. सत्तेसाठी पक्षाचे झेंडे बदलणाऱ्या जगतापांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. महापालिकेतील अनागोंधी कारभार, भ्रष्टाचार, रस्त्यांवरील अतिक्रमणे यावर गेल्या वर्षभरात जगतापांनी एकदाही तोंड उघडले नाही. अतिक्रमण आणि खाबुगिरीवर आम्ही केलेली टीका आमदार जगतापांना चांगलीच झोंबली. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायची सोडून वैयक्‍तिक टीका केली असे सांगत “लोगों की समस्या की बात उठाने पर आमदार जगताप को गुस्सा क्‍यों आता है ‘, असा सवाल शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला. तसेच महापालिका कोणाची जहागिरी नाही. तसेच, थेरगावांविषयी कायमच आकस बाळगणाऱ्यांना तेथील विकास दिसत नाही, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. 23) आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याबरोबर बैठक घेऊन शहरातील अतिक्रमण, कचरा, पाण्याच्या समस्या मांडून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे प्रश्न सोडविण्यात प्रशासन आणि सत्ताधारी अपयशी ठरत असल्याची टीका केली होती. त्यावर दुसऱ्या दिवशी आमदार जगताप यांनीही खासदार बारणेंवर टीका केली होती. त्याला आज सोमवारी (दि.27) खासदार बारणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रत्त्युत्तर दिले आहे.

खासदार बारणे म्हणाले की, मी सर्वसामान्य मानसांमध्ये मिसळतो. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारी, जनमानसाच्या समस्या लोकप्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांपुढे मांडणे माझे कर्तव्य आहे. त्यातून मी महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शहरातील समस्या मांडल्या होत्या. राष्ट्रवादीची सत्ता घालवून भाजपच्या हाती सत्ता दिली आहे. मात्र, त्यांनी सत्तेचा बाजार चालवला असून भ्रष्टाचार आणि “खाबुगिरी’तच ते गुरफटले असल्याने शहरातील नागरिकांच्या समस्येचा विसर त्यांना पडलेला आहे.

मी निवडणुकीला घाबरत नाही
मी केंद्राच्या योजनासाठी काय पाठपुरावा केला हे भाजपच्या मंत्र्यांना विचारा तेच तुम्हाला सांगतील. विधानसभा सोडून महापालिकेच्या कारभारातच रमण्यात अधिक धन्यता तुम्ही मानत असल्याने तुम्हांला शहरावासियांच्या व्यथा काय कळणार? निवडणुकांना मी घाबरत नाही. मी माझ्या कामाच्या जोरावर व लोक संपर्काच्या बळावर येणाऱ्या लोकसभेला उभा राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीत खोटी आश्वासने व “गाजर’ दाखवून निवडणुका मी लढवल्या नाहीत. माझ्या कर्तुत्वाच्या जोरावर मतदारांच्या आशीर्वादाने मी 2019 ला पुन्हा खासदार होणार आहे. त्यामुळे मला निवडणुकीची चिंता नाही. त्याची काळजी आमदार जगताप यांनी करू नये, असा उपरोधिक टोलाही खासदार बारणे यांनी आमदार जगताप यांना लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)