आमदार, खासदार, नगरसेवकालाच मतदान पण…

जळोची– वर्षानुवर्षे एक गठ्ठा मतदान करुन सुद्धा 20-20 वर्षे मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याने येथील नागरिकांनी अभिनव शक्कल लढवत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी फलक उभारुन त्यावर खासदारकीला केले… आमदारकीला केलं… नगराध्यक्षाला केलं… नगरसेवकाला पण मतदान केलं तरी पण विठ्ठला..पांडुरंगा..20 वर्षांत आमचा विकासच झाला नाही, असा उद्विग्न सवाल अन्‌ खंत बारामती शहरातील साठेनगर कसबा येथील रहिवाशांनी मागील वर्षीच व्यक्त केली आहे.
या भागात जवळपास दीड ते दोन हजार लोकसंख्येची वस्ती आहे. गेली वीस वर्षे नगर पालिकेने वा कोणत्याही नगरसेवकाने येथे साध्या मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत. कोणत्याही प्रकारचे हेवेदावे न करता एक मताने एक गठ्ठा राष्ट्रवादीच्या घड्याळाकडे बघून आम्ही भरघोस मताने नगरसेवकाला निवडून देत आहोत. मात्र, या भागात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी वारंवार स्थानिक नगरसेवकांसह पालिका – शासन प्रशासनाला तोंडी व लेखी पत्रव्यवहार करुन सुद्धा जाणीवपूर्वक या भागात दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
या भागातील समस्या प्रखरशाने निदर्शनास आणून देण्यासाठी इच्छा नसताना फलक उभारुन मांडाव्या लागल्या. शहराचा झपाट्याने विकास होत असताना गेल्या 20 वर्षांत विकासाची गंगा आमच्या वस्तीत अद्याप आलीच नसल्याची खंत येथील तरुण खेदाने व्यक्‍त करतात. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी नव्याने सुलभ स्वच्छतागृहे उभारली मात्र, या मागासवर्गीय वस्तीतील मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहाची केवळ डागडुजी करुन दुधाची ताक ताकावर भावण्याचा प्रयत्न केला आहे. येथील स्वच्छतागृहे नव्याने उभारण्यासाठी अनेकदा निविधा काढण्यात आल्या मात्र, या भागातील मातबर नगरसेवकाच्या दंडेलशाहीमुळे येथील स्वच्छतागृहेचे काम घेण्यास कोणताही ठेकेदार पुढे येत नाहीत.
साठेनगरचा भाग असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांना सत्ताधारी पक्षातील एक मातबर नगरसेवक स्वत:चा प्रभाग सोडून साठेनगर भागातील विकासकामे करु देत नसल्याचे नागरिकांमधून दबक्‍या आवाजात बोलले जात असून सत्ताधाऱ्यांकडूनच जर आमची वर्षानुवर्षे प्रंलबित कामे करण्यास अडथळे येत असतील तर आगामी निवडणूकां वेळी आम्हांला वेगळा विचार करावा लागेल अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

 • पालिका करते दुजाभाव
  नागरिकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तरुणाची संख्या लक्षणीय असून त्यांच्याकडून बारामती नगरपालिकेच्या कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. बारामतीचा चहूबाजूने विकास होत असताना आमच्या मागासवर्गीय वस्तीतील स्वच्छतागृह पालिका उभारत नाही. यावरुन पालिका दुजाभाव करत असल्याचे वाटते. असे येथील तरुण सांगतात.
 • केवळ 10 स्वच्छातागृहे
  साठेनगर भागातील लोकसंख्येच्या तुलनेत फक्त 10 स्वच्छतागृहे उपलब्घ आहेत. यामध्ये महिलासाठी पाच तर पुरुषांसाठी 5 आहेत. त्यामुळे लहान मुलांसह, ज्येष्ठांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागत आहे.
 • आत्ता पर्यंत आठ ते दहा वेळा निविदा निघाल्या आहेत. मात्र टेंडर न भरल्यामुळे येथील स्वच्छतागृहाचे काम प्रंलबित होते. सध्या टेंडर भरले असून वर्क आँर्डर देणे बाकी आहे. पुढील 15 दिवसांच्या आत काम सुरू होणार आहे.
  – नवनाथ बल्लाल, नगरसेवक, बारामती नगरपालिका
 • टेंडर पास झाले आहे. लवकरच वर्कऑडर देऊन येथील स्वच्छतागृहाचे काम करण्यात येईल.
  – तरन्नूम सय्यद, नगरसेविका, बारामती नगरपालिका.
 • शहराच्या सुशोभिकरणाच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. मात्र बारामती नगरपालिकेला वेळोवेळी निवेदने देऊन मोर्चे, आंदोलने करुन देखील येथील स्वच्छतागृहाच्या कामाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. हा दुजाभाव का?
  – विजय नेटके, स्थानिक नागरिक, साठेनगर बारामती
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)