आमदारांना चार वर्षांनंतर दिसली वाहतूककोंडी?

खेड तालुक्‍यात रंगली चर्चा : निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांची स्टंटबाजी?
चाकण- खेड तालुक्‍यात सध्या पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीने वातावरण चांगलेच तापले आहे. तर सोशल मीडियावर या कोंडीची खिल्ली उडवली जात असून, तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधींना “ट्रोल’ केले जात आहे. याचाच धस्का आमदार सुरेश गोरे यांनी घेतला का? की आगामी निवडणुकीसाठी आपले अस्तित्व दिसावे म्हणून आमदार गोरे यांच्यासह शिवसैनिकांनी अवैध वाहनचालकांना शिवसेना स्टाईलने पिटाळून लावण्याचा “स्टंट’ केला अन्‌ पोलीस कारवाई करीत नाही, असे गोंडस नाव दिले. त्यामुळे आमदार गोरे यांना चार वर्षांत येथील वाहतूक कोंडी दिसली नाही का? अशी चर्चा सध्या चाकणसह खेड तालुक्‍यात रंगली आहे.

चाकणला वाहतूककोंडी होत होती, त्यात नावीन्य असे काही नव्हते; मात्र गेल्या काही दिवसांपासून अचानक वाहतूककोंडी का व कशी होत आहे असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. वाहतूक पोलीस आपले काम चोख करीत असताना सुद्धा काही वाहनचालक आडमुठेपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत वाहने हाकतात. त्यामुळे वाहतूककोंडीमध्ये आणखीच भर पडत असून त्याचा ताण पुणे-नाशिक व तळेगाव-शिक्रापूर रस्त्यावरील वाहतुकीवर होऊन वारंवार कोंडी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बेशिस्तपणे रस्त्याकडेला मोकळी जागा दिसेल तिथे वाहन लावून जाणे, वाहतूक नियंत्रण दिव्याचे पालन न करता नियम मोडून वाहन हाकणे अशी बरीचशी कारणे चाकणच्या वाहतूककोंडीमध्ये भर घालत आहेत. चाकणच्या वाहतुकीला योग्य वळण लागणे ही काळाची गरज झाली असून चाकण हे वाहतूककोंडीचे शहर म्हणून ओळख झाली आहे. आता अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे राजकारण चांगलेच तापू लागले असून सोशल मीडियावर समर्थन आणि आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. तसे पाहिले गेले तर अवैध वाहतूकदार कोंडीला जसे कारणीभूत आहे, तसे बेशिस्त वाहनचालकही या कोंडीला कारणीभूत असल्याचे फेसबुक मित्रांच्या एक दिवसाच्या नियोजनाने सिद्ध झाले आहे.

दरम्यान, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालावी यासाठी आमदार सुरेश गोरे यांनी चाकण पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून चाकणमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या. तसेच चाकण नगरपरिषदने ही तसा ठराव मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी संबधित खात्याकडे पाठवून दिला. या सर्व घटनेला आठ दिवस उलटून गेल्यानंतरही परिवहन खात्याकडून व पोलीस प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर जुजबी कारवाई केली. एकीकडे कोंडीचा प्रश्‍न गंभीर होत असताना संबंधित खात्याकडून होणारी कारवाई फक्‍त देखावा आहे, असे म्हणत आमदार गोरे यांच्यासह शिवसैनिकांनी थेट अवैध प्रवासी वाहनचालकांवर शिवसेना स्टाईलने कारवाई करीत कायदाच हातात घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेला या आधी वाहतूककोंडी दिसली नाही का? यांना आताच कशी वाहतूककोंडी दिसली असे प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

चाकण शहरात रोजच वाहतूककोंडी होत असून त्याबाबत प्रशासनास विनंती करून सूचनाही केल्या मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. म्हणून आम्हाला रस्त्यावर यावे लागले. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांना तेथून काढून देत असताना त्यांचा मुजोरपणा दिसून आला म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना हुसकावून लावले. यामध्ये कोणालाही मारहाण झाली नाही. काही वाहनांचे नुकसान झाले आणि आमच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, जनतेच्या प्रश्‍नांबाबत कटिबद्ध असून असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील.
– सुरेश गोरे, आमदार

 परिवहन खाते शिवसेनेच्या ताब्यात तरीही…
पुणे-नाशिक महामार्ग हा तसा प्रचंड वर्दळीचा मार्ग आहे. तसेच पुणे-नाशिक अन्‌ नाशिक ते पुणे येथे प्रवास करणारे प्रवासी अधिक असून इतर गावांना जाणारे ही प्रवासी आहे. तर पुणे-नाशिक, नाशिक-पुणे बसेस अनेकवेळा वेळेवर धावत नाही, अचानक रद्द होणे, त्यातच अनेक बस चालक-वाहक नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण आदी महत्त्वाच्या ठिकाणी बसेस न थांबता थेट निघून जातात, त्यामुळे प्रवाशांना नाइलाजस्तव अवैध प्रवासी वाहनांनी प्रवास करावा लागतो. त्यातच परिवहन खाते शिवसेनेकडून असून या बस चालक-वाहकांना समज देणे, बसेस वेळेवर धावतील याकडे लक्ष देण्याचे प्रयत्न करण्या ऐवजी शिवसैनिक अवैध वाहतूकदारांना टार्गेट करतात हे कितपत योग्य आहे, असा सवाल प्रवाशांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)