आमचं ठरलं… उद्या फायनल निर्णय

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापने बाबत कॉंग्रेस ाणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील चर्चा पूर्ण झाली असून त्याबाबत शुक्रवारी शिवसेनेशी मुंबईत अंतीम चर्चा केल्यानंतर महाआघाडी आकारास येईल, असे या दोन्ही पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेने पुढे आणल्यास त्याला विरोध करण्यात येणार आहे. त्याऐवजी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला सर्व नेत्यांची संमती आहे. त्यामुळे सेना कॅणती भूमिका घेणार याला महत्व आले आहे.

शिवसेनेशी चर्चा करण्यापुर्वी निवडणुकीपुर्वी आघाडीत असणाऱ्या शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असे या दोन्ही कॉंग्रेसनी स्पष्ट केले. शिवसेनेशी युती करण्याबाबत मॅरेथॉन मिटिंगचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा झपाटा दिल्लीने गेल्या काही दिवसांत अनुभवला. या दोन्ही पक्षापेक्षा वेगळी विचारसरणी आणि कार्यपध्दती असणाऱ्या पक्षा बरोबर जायचं की नाही याबाबत दोन्ही कॉंग्रेसमध्ये सखोल मंथन करण्यात आले.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, जयराम रमेश, मुल्लकार्जून खर्गे आणि त्या पक्षाचे राज्यातील नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नसीम खान या चर्चेत सहभागी झाले. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि नवाब मलिक सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सर्व मुद्‌द्‌यांवरील चर्चा पूर्ण झाली आहे. सर्व मुद्‌द्‌यांवर एकमत झाले आहे, असे चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले. आघाडीचे स्वरूप कसे असेल, याबाबतचा निर्णय उद्या घेण्यात येईल. अंतिम निर्णयाची घोषणा मुंबईत करण्यात येईल. किमान समान कार्यक्रमाची घोषणा केल्यामुळे सरकारच्या धोरणाचा तपशील स्पष्ट होऊ शकेल. सर्व मुद्‌द्‌यांबाबत तीनही पक्षांत एकमत झाल्यानंतर राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल.

मुख्यमंत्रीपद हे वाटून घेणार का? हे विचारता चव्हाण म्हणाले, याबाबतची सर्व वृत्त अंदाजे दिली आहेत. या बाबत शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतर सर्व तपशील देण्यात येईल. त्यात किमान समान कार्यक्रम आणि सत्तावाटपाचे सूत्र आदी तपशील असेल.

दरम्यान, कॉंग्रेस कार्यकारिणीची मान्यता मिळाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युवराज आदीत्य यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्याला दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी विरोध व्यक्त केला आहे. यामुळे दोन्ही कॉंग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितले. त्याला शिवसेनेने मान्यता दिली. त्यानंतर दोन्ही कॉंग्रेसने उध्दव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी जाहीररित्या दाखवली. आदित्य यांच्या नेतृत्वा बरोबरच मंत्रीपदांच्या वाटपाचा निर्णयही या चर्चेत अडथळा ठरत आहे. अधिकृत घोषणा करण्याआधी किमान समान कार्यक्रम मंजूर करावा, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे.

दरम्यान, कॉंग्रेस कार्यकारिणीची (सीडब्लूसी) दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला मान्यता देण्यात आली. या बैठकीमध्ये कॉंग्रेस नेते केसी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, अंबिका सोनी, अहमद पटेल, ए के अँटोनी यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. दरम्यान, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आघाडीची घोषणा केली जाऊ शकते.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये बुधवारी तब्बल 5 तास चर्चा झाली. मध्यरात्री ही बैठक संपली. त्यानंतर, शिवसेनेबरोबर समान कार्यक्रमाबाबत फोनवरुन चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.