आनंद-नाकामुरा यांच्यात बरोबरी 

स्टॅव्हेन्जर – भारताचा माजी जगज्जेता विश्‍वनाथन आनंद आणि त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी गणला जाणारा अमेरिकेचा अव्वल खेळाडू हिकारू नाकामुरा यांच्यात आल्टिबॉक्‍स नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत झालेली लढत अखेर बरोबरीत सुटली. अन्य लढतींपैकी विश्‍वविजेत्या मॅग्नस कार्लसनने सर्गेई कार्जाकिनविरुद्ध बरोबरी साधली. तसेच फॅबियानो कारुआना आणि शहरयार मामेद्यारोव्ह यांच्यातील लढतही बरोबरीत सुटली.
पहिल्या फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळतानाही आनंदला अर्मेनियाच्या लेव्हन अरोनियनविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. आज काळी मोहरी घेऊन खेळताना आनंदला नाकामुराविरुद्ध बरोबरी साधताना तुलनेने अधिक परिश्रम करावे लागले. नाकामुराने क्‍वीन्स गॅम्बिट डिक्‍लाईन्ड या ओपनिंगनंतर अत्यंत दुर्मिळ अशी सहावी चाल करीत आनंदला पेचात पकडले.

या चालीमुळे आनंद गोंधळात पडल्याचे दिसून आले. परंतु नाकामुराने केलेल्या पुढच्या चालींमुळे “ती’ चाल तितकीशी नुकसानकारक नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान आनंदने आपली बाजू मजबूत करताना बचावावर भर दिला. नाकामुराच्या आक्रमणाला आनंदने तोडीस तोड उत्तर दिले आणि दोघांनीही एकमेकांची अनेक मोहरी मारली. अखेर दोघांकडेही केवळ हत्ती व प्यादे शिल्लक राहिल्यामुळे 39व्या चालीनंतर उभयतांनी बरोबरी मान्य केली. आजच्या अन्य सर्व लढतींमध्येही निकाल लागू शकला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)