आनंदाची बातमी : शिर्डी विमानसेवा आजपासून सुरू

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे जवळपास अनेक महिने बंद असलेलं शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. आज सकाळी दिल्लीतून पहिले विमान ११.३० वाजता शिर्डीत दाखल होणार आहे. तर १२.३० वाजता हेच विमान दिल्लीच्या दिशेने पुन्हा रवाना होईल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला. यामुळे आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवा काही प्रमाणात स्थगित करण्यात आली होती. यात शिर्डी विमान सेवा देखील बंद होती. परंतु कोरोना संसर्ग कमी होत असल्याने राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे खुली करण्याची परवानगी दिली आहे.

यात शिर्डीतील साईबाबा मंदिरही आता भाविकांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसागणिक वाढतेय. मंदिरं सुरु झाल्याने विमानसेवा देखील सुरु होणे गरजेचे होते. त्यामुळे भाविकांच्या सोईसाठी शिर्डी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनानंतर शिर्डी विमानतळावरील सेवा जवळपास दीड वर्षांनी सुरु होत आहेत. आज दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईवरून साईभक्तांसाठी विमान उड्डाण सुरु होणार आहे. दिल्लीवरून साडे अकरा वाजता, हैदराबादहून दुपारी अडीच वाजता आणि चेन्नईवरून दुपारी चार वाजता विमानाचं शिर्डी विमानतळावर लँडिंग होणार आहे. कोरोनामुळे बंद असलेली विमानसेवा पून्हा सुरु होत असल्याने साई भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

शिर्डी विमानतळावर सुरुवातीला स्पाईसजेट, इंडिगो एअरलाइन्सची सेवा दिल्ली हैदराबाद आणि चेन्नई ठिकाणसाठी असणार आहे. त्यानुसार विमानाचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे साईभक्तांनी प्रवास करण्यापूर्वी हे वेळापत्रक पाहावं लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.