आदिवासींच्या विकासासाठी खासदारांनी किती निधी आणला? -मधुकर पिचड

अजनावळे-आदिवासींना वनवासी म्हणून हिणवणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवायची आहे, असे आवाहन करतानाच येथील खासदार शिवाजीराव आढळरावांनी आदिवासींच्या विकासासाठी किती निधी आणला, असा जाब माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी येथे विचारला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, अतुल बेनके, सत्यशील शेरकर, पांडूरंग पवार, गणपत फुलवडे, किशोर दांगट, उज्ज्वला शेवाळे, शोभा शिंदे, शरद लेंडे, अशोक घोलप, सरपंच वसंत लांडे, मारुती वायाळ, काळू शेळकंदे, निलेश रावते, ललित जोशी आदी उपस्थित होते. या सभेला ग्रामस्थांची मोठी गर्दी होती.

पिचड म्हणाले, आदिवासींसाठी शरद पवार यांच्या पुढाकारातून आम्ही स्वतंत्र बजेट मांडले. समाजाच्या प्रवाहात आदिवासी आले पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना शिक्षण, आरोग्य आदी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे या हेतूने आम्ही कार्यरत होतो आणि राहणार आहोत. त्यासाठीच डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून द्यायचे आहे.

नोटबंदीवेळी सामनाच्या अग्रलेखातून झिंगलेल्या माकडाची गोष्ट असा अग्रलेख लिहणारे ठाकरे राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. दिल्लीवरून अफजल खान आला तरी स्वबळावरच लढणार असा नारा देत होते आणि त्याच अमित शहाचा अर्ज भरण्यासाठी गुजरातला गेले?
वळसे पाटील म्हणाले, आदिवासी बांधवांना आरोग्य, शिक्षण यासह अन्य सुविधा मिळाव्यात आणि त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी विकासात्मक कार्यक्रम पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आदिवासी मुलांचे व्यावसायिक शिक्षणाचे शुल्क शासनाकडून भरले जाईल याचा निर्णय मंत्रिमंडळात आम्ही घेतला. ही निवडणूक तुमचं – आमचं भविष्य घडविणारी आहे.

डॉ. कोल्हे म्हणाले, स्वाभिमान आणि स्वावलंबन या दोन चाकांच्या आधारे मी काम करणार आहे. मतदारसंघात आदिवासी मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्या न्याय हक्कासाठी, रोजगारनिर्मिती तसेच आदिवासी युवकांना चांगलं शिक्षण व कलागुणांना वाव मिळेल असे व्यासपीठ उभे करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. शिक्षण, आरोग्य हा मुलभूत अधिकार असला पाहिजे. तरुणांसाठी यूथ गाईडन्स सेंटर, पर्यटन विकास आदींसह मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा माझ्याकडे आहे आणि जे पंधरा वर्षांत झाले नाही ते मी पाच वर्षांत करून दाखविणार.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.