मुक्‍त शाळा केंद्रासाठी अर्ज करा : बोर्डाचे आवाहन

राज्यात लवकरच मुक्‍त विद्यालय : शाळा केंद्रासाठी अर्ज करा : बोर्डाचे आवाहन
पुणे- राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य मुक्‍त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली असून आता राज्यात इयत्ता पाचवी, आठवी, दहावी व बारावीचे शिक्षण तसेच परीक्षा या मुक्‍त विद्यालयाच्या माध्यमातून देता येणार आहे. यासाठी राज्यातील शाळांना मुक्‍त शाळा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.
केंद्राच्या धर्तीवर राज्यातही विद्यार्थ्यांना मुक्‍त विद्यालय असावे, अशी मागणी जोर धरत होती. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने मुक्‍त विद्यालय मंडळाची स्थापना केली असून राज्यात लवकरच मुक्‍त विद्यालय सुरू होणार आहेत.
मुक्‍त शाळांमध्ये विद्यार्थी इयत्ता पाचवी, आठवी, दहावी, बारावीचा अभ्यास व परीक्षा देऊ शकणार आहे. या मुक्‍त शाळांमध्ये नियमित शाळेप्रमाणे काही अनिवार्य विषय वगळता कोणत्याही विषयाचे बंधन असणार नाही. विद्यार्थी या शाळेत मुक्‍तपणे शिकू शकणार आहेत. यामध्ये विद्यार्थी थेट अर्ज करुन परीक्षेलाही बसू शकतील. मुक्‍त विद्यालय मंडळाची कार्यवाही सुरू झाली असून त्यानुसार आता राज्यातील तालुकास्तरावर प्रत्येकी एक केंद्र तर महापालिका क्षेत्रात प्रत्येकी दोन केंद्र सुरू करण्यत येणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे त्याचे स्तर असून प्रत्येक स्तरावर एक ते दोन केंद्र असणार आहेत. या केंद्रात पन्नास विद्यार्थ्यांची नोंदणी होणे आवश्‍यक आहेत. ज्या शाळांना ही केंद्र आपल्या शाळांमध्ये हवी आहेत. त्यांच्यासाठी शासनाने काही अटी घातल्या असून त्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन अर्ज करणे आवश्‍यक आहे. याची माहिती राज्य बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. शाळांनी अर्ज केल्यानंतर भौतिक तसेच गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून मंडळाची समिती शाळांची तपासणी करेल व त्यानंतर हे केंद्र मान्य करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. दि. 10 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत शाळांना यासाठी अर्ज करता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)