आता “डुक्करमुक्त’ पुणे मोहीम

भटक्‍या कुत्र्यांवर कारवाईवेळी नियमांचा अडसर


महापालिका मुख्य सभेत आयुक्तांची माहिती

पुणे – महापालिका हद्दीत डुक्कर पालन हा अनधिकृत व्यवसाय आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. 10 सप्टेंबरपासून पुणे शहरात डुक्‍करमुक्त पुणे मोहीम राबविणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी मुख्यसभेत दिली. मात्र, भटक्‍या कुत्र्यांवर कारवाई करताना अनेक नियमांचा अडसर असल्याची कबुलीही आयुक्तांनी यावेळी दिली.

शहरात गेल्या काही वर्षांत डुक्‍कर आणि कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून तक्रारी वाढल्या आहेत. अशा स्थितीत मोकाट कुत्री नियंत्रणासाठी नियमांमध्ये प्रभावी बदल करण्यात यावेत, तशी मागणी केंद्र व राज्यशासनाकडे करण्यात यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव नगरसेवक विशाल तांबे यांनी दिला होता. तर, भटक्‍या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण असून नागरिकांना घराबाहेर पडणेही शक्‍य नसल्याचे सांगत यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी करताना तसेच त्यासाठी आवश्‍यक साधनसामग्री नसल्याने ही कारवाई अधिक प्रभावी करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. तसेच पालिकेच्या रुग्णालयातही तातडीने मोठ्या प्रमाणात रेबीज प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. याच वेळी हडपसर भागातील नगरसेवकांनी अनधिकृत डुक्कर व्यवसायिकामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाल्याचे सांगितले. या समस्येबाबत प्रशासन काय उपाययोजना करणार, अशी विचारणा केली. त्यावर आयुक्तांनी खुलासा केला.

आयुक्त म्हणाले, “महापालिकेकडून मोकाट कुत्री आणि डुक्कर पकडण्याची कारवाई सुरू आहे. मात्र, ती परिणामकारक पद्धतीने होत नाही. त्यामुळे प्रशासनाने डुक्कर पकडण्यासाठी प्रभावी धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डुक्करमुक्त पुणे मोहीम हाती घेतली जाणार असून त्याची सुरूवात हडपसर पासून केली जाणार असून पुढील 2 महिन्यांत शहर 100 टक्के मुक्त करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. हा व्यवसाय अनधिकृत असल्याने त्याचे पुनर्वसन करता येणार नाही. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तसेच वेळ पडल्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू करून ही कारवाई केली जाणार आहे. मात्र, त्याच वेळी मोकाट कुत्र्यांवर कारवाई प्रभावीपणे होत नसल्याने उपलब्ध यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)