आता जयंती उत्सवांसाठी ट्रस्ट

पिंपरी – उच्च न्यायालयाने करदात्यांच्या पैशातून धार्मिक सण व उत्सव साजरे करण्यास महापालिका व स्थानिक संस्थांना बंदी केली आहे. यामुळे महापालिकेसमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत उत्सव व जयंती साजरी करण्याबाबतचे धोरण महापालिका प्रशासनाकडे नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 28) आयोजित बैठकीत नाराजी व्यक्त केली. जयंती उत्सव साजरे करण्यासाठी महापालिका ट्रस्ट स्थापन करणार असून गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर लवकरच शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

महापौर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, कायद्याच्या चौकटीत राहून जयंती उत्सव कसे साजरे करता येतील याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, मुंबई अथवा पुणे महापालिकेच्या पार्श्‍वभूमीवर एक स्वतंत्र ट्रस्ट तयार करुन त्याद्वारे उत्सव साजरे करण्याचा एक पर्याय समोर आला. यामध्ये गणेश फेस्टीवल सारखे धार्मिक सण साजरे करता येतील. मात्र यावेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार यामध्ये महापालिकेचा कोणताही थेट संबंध नसेल, तसेच करदात्यांच्या पैशातून हे उत्सव होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. यावेळीही 2017 साली ज्या गणेश मंडळांची स्पर्धा महापालिकेच्या वतीने घेतली गेली होती. त्याचे बक्षीस महापौर राहुल जाधव यांनी स्वखर्चातून दिले आहे. त्यामुळे यापुढे अशी कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी आधीच नियोजन केले जाणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी, महापालिका गणेश विसर्जन काळात स्वागत कक्ष उभारू शकत नसली तरी मदत कक्ष उभारू शकते तसेच जयंती काळात करमणूक किंवा केवळ पैशाची उधळपट्टी न करता पालिका प्रबोधनपर कार्यक्रम घेऊ शकते, असे सांगितले. प्रबोधनात्मक उपक्रमांचा नागरिकांनाही फायदा होणार आहे.

यावेळी महापौर राहुल जाधव यांनी सूचना लक्षात घेता सोमवारी (दि. 1 ऑक्‍टोबर) सर्व गटनेत्यांची बैठक बोलावून यावेळी पुढील वर्षीच्या सर्व जयंती व उत्सवाचे धोरण ठरवणार असल्याचे सांगितले. जेणे करुन यावर्षी सारखा गोंधळ उडणार नाही व नागरिकांची मने दुखावली जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या साऱ्याचा खर्च किती व कोठून येणार याचे उत्तर पदाधिकाऱ्यांकडे यावेळी नव्हते.

प्रशासनाच्या धोरणाअभावी नामुष्की
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत मुंबई व पुणे महापालिकेने गणेशोत्सव साजरा केला. परंतु, पिंपरी-चिंचवड माहापालिकेला ते जमले नाही याचे धोरण महापालिकेने आधीच ठरवले असते तर अशी नामुष्की आली नसती असा आरोप सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी प्रशासनावर केला. स्थायी समितीने या आधीच प्रशासनाला सर्व जयंती व उत्सव यांचे एक कॅलेंडर व नियोजन करण्यास सांगितले होत. मात्र त्याची अद्याप कोणतीच अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यंदा गणेश फेस्टीवल किंवा गणपती मंडळांच्या स्पर्धा महापालिकेला घेता आल्या नाहीत. त्या आता पुढील वर्षी नक्की घेऊ, असे आश्‍वासन महापौर जाधव यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)