आता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्‍वास
लोणंद, दि. 23 (प्रतिनिधी) –
भाजपने सत्तेवर आल्यापासुन एकाधिकारशाही सुरु केली आहे. आणि आता जनताही भाजप सरकारच्या निर्णयांमुळे वैतागली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल, असा ठाम विश्‍वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. लोणंद, ता. खंडाळा येथे खंडाळा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष रणजित निबांळकर, सत्यजित तांबे, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. बाळासाहेब बागवान, धनश्री महाडिक, गणेश जगताप, शिवराज मोरे, विराज शिंदे,जयदीप शिंदे, उपसभापती वंदनाताई धायगुडे, गुरुदेव बरदाडे, जयकुमार शिंदे, एस. वाय. पवार, राजेंद्र डोईफोडे, हेमलता कर्णवर, शैलजा खरात, स्वाती भंडलकर, मस्कुअण्णा शेळके, तारीक बागवान, ओमकार कर्णवर, शुभम खरात विशाल शेळके, विशाल भंडलकर आदीची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले
आता विरोधी पक्षाचे सरकार येणार असून विरोधी पक्षात सर्वात मोठा कॉंग्रेस पक्ष आहे, एका बाजूला दुष्काळ आणि दूसऱ्या बाजूला नोटाबंदीसारखा निर्णय मोदीस सरकारने हट्टापायी घेतला आहे. आपल्या काही मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्याची संधी या नोटबंदीच्या निर्णयाने घेतली, मात्र यात शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. नोटबंदीमुळे शेतकरी भरडला गेला. मोदी सरकारने 3 हजार कोटींची घोषणा केली पण आजपर्यंत किती कर्जमाफी झाली आहे.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, राष्ट्रवादी बरोबर आघाडी करा पण फिफ्टी फिफ्टी करा. रणजित दादांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाला आपल्याला सातारा जिल्ह्यात एक नंबरला नेऊन ठेवायचे आहे. जिथे जिथे कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला माजी गरज लागेल तिथे जयकुमार गोरे त्यांच्या पाठीशी उभा असेल.
रणजीत निबांळकर म्हणाले, जिल्हा कॉंग्रेसचे नेतृत्व पृथ्वीराजबाबा करत असताना कार्यकर्त्यांनी धुसफुस घालणे योग्य नसून देशाच्या हितासाठी जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जिल्ह्यात कॉंग्रेस वाढवण्याचे काम मी व आमदार जयकुमार गोरे करणार आहे.
ऍड. बाळासाहेब बागवान म्हणाले, देशातील सर्वसामान्याच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेस पुढे सरसावली आहे. भाजपचे सरकार हे जातीयवादी व अतिरेकी विचाराचे असून यापुढे कॉंग्रेसच्या पाठीशी ठाम उभे राहुन जिल्हा कॉग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.