आतले तुपाशी, पोलीस उपाशी

मतमोजणी केंद्रावरील प्रकार; अधिकाऱ्यांकडून अन्नाची नासाडी

प्रशांत जाधव, सातारा, दि. 23

लोकसभेच्या सातारा मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी तसेच पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावत होते. एका बाजूला पोलीस दल वगळता मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणाऱ्या इतर विभागांची चांगलीच चांदी झाली. त्यांना चमचमीत खाद्य पदार्थ, सुका मेवा, उन्हाळ्यापासून बचावण्यासाठी अधून मधून ताकाचा गारवा मिळत होता. मात्र, मतमोजणी केंद्रावर तसेच बाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मात्र एका केळावर समाधान मानावे लागल्याने “” आतले तुपाशी, बाहेरचे उपाशी” असा सूर पोलीस कर्मचाऱ्यांच्यात उमटला होता.

सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयडीसीतील एका गोडाऊनमध्ये होती. जिल्ह्यातील विविध सरकारी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी तसेच त्यासंदर्भातील इतर कामांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या विभागांच्या बरोबरीनेच सुरक्षेचे कारणास्तव जिल्हा पोलीस दलाकडून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. उन्हाचा पारा वाढेल तसा मतमोजणी केंद्राच्या आत असलेल्या अधिकाऱ्यांना ताक, सुका मेवा पुरवण्यात येत होता.

जेवणाची वेळ झाल्यानंतर तर आतील अधिकाऱ्यांना अतंत्य चमचमीत असा जेवणाचा बेत होता. सर्व पदार्थांची तपासणी करून आत सोडणाऱ्या पोलीस दादांना व अधिकाऱ्यांना केवळ त्याकडे पाहण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. मतमोजणी केंद्र व परिसरात एक हजाराच्या सुमारास पोलीस कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

त्यांना सकाळपासून केवळ पाणी आणि एका केळावर समाधान मानावे लागल्याने अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. एकीकडे पोलीसांना खायला काहीच नसताना चमचमीत खाद्यपदार्थ खाणाऱ्या आतील अधिकाऱ्यांनी आपल्या ताटातच उरले सुरले अन्न ठेवत त्याची नासाडी केली.

एकीकडे अगदी पाच फुटावर असलेल्या पोलीसांना खायला वेळेत नाही अन्‌ दुसरीकडे दुष्काळाने जनता होरपळत असताना अधिकाऱ्यांनी केलेल्या अन्नाच्या नासाडीला नेमके म्हणावे तरी काय, असा प्रश्‍नही उपस्थित
होत होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)