पुणे जिल्ह्यात 468 व्यक्तींना मिळणार मानधन
पुणे – आणीबाणीच्या काळात महिन्यापेक्षा अधिक काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना अथवा त्यांच्या वारसांना शासनाकडून “पेन्शन’ देण्यात येते. राज्यातील 1 हजार 906 व्यक्तींना याचा लाभ मिळणार असून यासाठी शासनाने 4 कोटी 54 लाख 87 हजार रुपयांचा निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 468 व्यक्तींना मानधन मिळणार असून त्यासाठी शासनाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी 12 लाख 82 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
आणीबाणीच्या काळात एक महिन्यांपेक्षा जास्त कारवास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 10 हजार रुपये आणि एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना 5 हजार रुपये पेन्शन देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने याविषयीची कार्यवाही सुरू केली होती. याचाच एक भाग म्हणून येरवडा कारागृह निरीक्षकांकडून यादी मागविण्यात आली आहे. तसेच नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेले 468 व्यक्तींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
भारतामध्ये 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत आणिबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान करण्याचा प्रस्ताव 2 जानेवारी 2018 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. या बैठकीमध्ये यावर मंत्रिमंडळात चर्चा करण्यात आली आणि याविषयावरील धोरण ठरविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती नेमण्यात आली. महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीने यासाठीचे धोरण ठरविले. त्या धोरणानुसार आणिबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारवास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 10 हजार व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अथवा पतीस 5 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक रुपये 5 हजार , तर त्यांच्या पश्चात पत्नी अथवा पतीस अडीच हजार रुपये मानधन मिळणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी वितरीत केलेल्या अनुदानापेक्षा अधिक खर्च होणार नाही. तसेच हा निधी शासन मान्यता प्राप्त बाबींकरीताच खर्च करण्याची दक्षता घ्यावी, असेही शासनाने म्हटले आहे.