आणखी एक पाटणकर आखाड्यात?

पाटण विधानसभा मतदारसंघात राजकीय धुमशान सुरू
कराड, दि. 26 (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीत काठावरच्या निकालामुळे राज्यात लक्षवेधी ठरणार्‍या पाटण विधानसभा मतदार संघातील राजकारण ढवळायला सुरूवात झाली आहे. पाटणकर-देसाई या पारंपारिक गटातच आतापर्यंत निवडणुका झाल्या. मात्र येत्या निवडणुकीत आणखी एक पाटणकर विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
विक्रमबाबा पाटणकर यांनी 1999 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत मताधिक्क्याने विजय मिळविला. यानंतर विक्रमबाबा उपाध्यक्ष झाले. त्यावेळी ते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याच गोटात होते. पुढे 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाईंनी पाटणकरांना निसटत्या फरकाने पराभूत केले. पाटणकरांच्या पराभवाला विक्रमबाबांना कारणीभूत ठरविले गेले. तेव्हापासून पाटणकर गटाची विक्रमबाबांवरील मर्जी खप्पा झाली होती. मध्यंतरी त्यांच्यातील राजकीय संबंध पुन्हा सुधारले.
आमदार शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक. विक्रमबाबा हे विक्रमसिंह पाटणकरांचे निकटवर्तीय. परंतु, बाबांचा शंभूराजेंशी छुपा दोस्ताना. एखाद्या सार्वत्रिक ठिकाणी अथवा कार्यक्रमात गाठ पडली, तर शंभुराज विक्रमबाबांशी दिलखुलास गप्पा मारतात. पत्रकारांनी त्याबद्दल छेडले, तर आ. देसाई म्हणतात, विक्रमबाबा माझे मित्र आहेत! शंभूराज-विक्रमबाबांच्या अशा मैत्रीमुळे विक्रमसिंह पाटणकरांच्या गोटात अस्वस्थता निर्माण होते. किंबहूना आ. देसाईच अशी काही गुगली टाकतात की विक्रमबाबांचं नेमकं चाललंय काय, असा सवाल पाटणकरांच्या गोटात निर्माण होतो.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदानंतर विक्रमबाबांकडे बरीच वर्षे मोठे पद नव्हते. पाटण बाजार समितीचे सभापती पद त्यांना मिळाले. मात्र, तिथे त्यांच्या निर्णयाला विरोध होऊ लागला. तसेच त्यांच्या विरोधात अविश्वास ठरावही संमत झाला. त्याविरोधात विक्रमबाबांनी सहकार मंत्र्यांकडे अपिल केले आणि तो निकाल विक्रमबाबांच्या बाजूने लागला. अर्थात सहकार मंत्री सुभाष देशमुख हे भाजपचे असल्याने निकालाबाबत राजकीय चर्चा सुरू झाल्या. ना. गिरीष बापट यांनीही विक्रमबाबांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी राजकीय अनुषंगाने चर्चाही झाली होती. यावरून विक्रमबाबा भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जाऊ लागले.
विक्रमबाबा पाटणकर हे येत्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले तर त्यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडणार, याचे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जाऊ लागले आहेत. पाटणकर म्हावशी, हेळवाक, या गटांमध्ये आघाडी घेतात, तर आ. शंभूराज देसाई हे नवारस्ता, मल्हारपेठ, ढेबेवाडी, कुंभारगाव, तारळे या भागात मते मिळवून पाटणकरांची आघाडी कमी करतात. पाटण आणि परिसरातून पाटणकरांना मिळणार्‍या मतांची विभागणी झाल्यास देसाईंना निवडणूक सोपी होऊ शकते. म्हणूनच विक्रमबाबांची उमेदवारी येत्या निवडणुकीत चर्चेची असणार आहे. आपल्या विरोधातील अविश्वास ठराव स्थगित करून पाटणकर गटाला त्यांनी उघड आव्हान दिले आहे. त्यांचा हा पवित्रा कोणाला त्रासदायक आणि कोणाला लाभयदायक ठरणार, हे समजण्यासाठी विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबावे लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)